Join us

पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 9:59 AM

मागील पावसाळ्याप्रमाणे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले.

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत कोणतीही दुर्घटना घडून जीवित वा मालमत्तेची हानी होऊ नये, यासाठी महापालिका आणि अन्य यंत्रणांनी मिळून ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य ठेवले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मागील पावसाळ्याप्रमाणे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त केले. दुसरीकडे अजून तरी पाणी कपातीचा कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.  

शिंदे यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण  कक्षास भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर व मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच रेल्वे, बेस्ट, सैन्य दल, एनडीआरएफ, म्हाडा, एमएमआरडीए आणि अन्य यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. पावसाळ्यात दुर्घटना घडून जीवित व मालमत्ताहानी होऊ नये, हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. नालेसफाईवरून सुरू झालेल्या वादाकडे लक्ष वेधले असता नालेसफाईचे काम अजून सुरू असून,  १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा आम्ही अजून केलेला नाही; परंतु येत्या काही दिवसांत नालेसफाई पूर्ण होईल. नाल्यातून किती गाळ काढला यापेक्षा नाल्याचा तळ लागेपर्यंत गाळ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रेल्वे बंद पडल्यास बेस्टच्या जादा बस सोडल्या जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.

संरक्षक जाळ्या बसवण्याबाबत चर्चा-

१) दरडग्रस्त भागांतील रहिवाशांचे स्थलांतर करणे, दुर्घटना घडल्यास त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे, यासाठी संक्रमण शिबिरे, प्रकल्पग्रस्तांची घरे, शाळा उपलब्ध करून देणे यादृष्टीने सूचना केल्या आहेत. 

२)  दरडी कोसळणाऱ्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात येतील का, याविषयी संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

 ‘होर्डिंगसाठी ते निकष पाळावेच लागतील’-

१) होर्डिंगच्या आकाराबाबत पालिकेचे निकष पाळण्यास रेल्वेने नकार दिला आहे, हे शिंदे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर पालिकेचे निकष पाळावेच लागतील, अशा सूचना रेल्वेला दिल्या आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

२) रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे येत्या दोन-अडीच वर्षांत पूर्ण होतील. एकही डांबरी रस्ता किंवा खड्डा दिसणार नाही. पुढील ३५ ते ४० वर्षे काँक्रिटचे रस्ते टिकतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

ॲपवरील तक्रारींची तातडीने दखल-

कचरा, नाल्यातून काढलेला गाळ अजूनही तेथेच पडलेला असल्यास नागरिकांनी पालिकेच्या ॲपवर फोटो अपलोड करावा. त्याची दखल घेत कार्यवाही केली जाईल. यंदा हवामान खाते अधिक तयारीत असून, त्यांचे अंदाज अचूक ठरतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदेमोसमी पाऊस