मुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालून केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे रंगबदलू असल्याचे विधान केले होते. यावर आता रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे काय असतं हे असुदुद्दीन ओवैसी यांना महाराष्ट्रात आल्यानंतर समजेल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
असुदुद्दीन ओवैसी यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे त्रृतू सारखे रंग बदलत आहे. त्यामुळे ते आता रंगबदलू हिंदुत्वादी झाले असल्याची टीका राज ठाकरेंवर केली होती. असुदुद्दीन ओवैसीच्या या टीकेला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंवर टीका केल्याने असुदुद्दीन ओवैसी यांना प्रसिद्धी मिळते असं अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच ओवैसींच्या राज ठाकरे रंगबदलू आहेत या विधानावरुन रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल असा इशारा अविनाश जाधव यांनी असुदुद्दीन ओवैसींना दिला आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील व्हिडिओ शेअर करुन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला होता. एन्टरटेनर कोणाला म्हणता असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंच्या नादी लागू नका, हवं असल्यास अबू आझमी यांना विचारा असं सांगत बाळा नांदगावकर यांनी एमआयएमच्या नेत्यांना इशारा दिला होता. त्याचप्रमाणे इम्तियाज जलील यांच्या आम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ या विधानावरुन एकदा प्रयत्न तर करा असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना दिला होता.
राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा
देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझौता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.