मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या; असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 11:16 PM2021-12-11T23:16:55+5:302021-12-11T23:17:08+5:30

मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले. 

AIMIM chief Asaduddin Owaisi demands reservation for Muslim children | मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या; असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या; असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

Next

मुंबई: मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. एमआयएमच्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १४४ कलम लागू केलं. मात्र आगामी काही दिवसांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील मुंबईत येणार आहेत. त्यावेळीही तुम्ही मुंबईत १४४ कलम लागू करणार आहात का?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. 

तिरंगा रॅलीमुळे महाविकास आघाडीला आडचण आली आहे. तिरंगा म्हणजे भारताची देशाची ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झालेले देखील राष्ट्रवाद सांगतात. शिवसेना आता राष्ट्रवाद विसरली का? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकार आता तिरंग्याविरोधात गेले असल्याची खंत असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे. आरक्षणासाठी एमआयएमकडून आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या रॅलीमध्ये मुंबईतील चांदिवली भागात दाखल झाले होते. त्यावेळी असदुद्दीन ओवैसी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुस्लिम आरक्षणावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने भाषणे दिली. परंतु आरक्षण कुठे आहे. कधीपर्यंत तुम्ही अशीच फसवणूक करून घेणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे, असं असदुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले. मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या, असंही असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. तसेच मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले. 

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी समाजाचे देखील कौतुक केले आहे. मराठा बांधवांकडून खूप शिकण्यासारखं आहे. आरक्षणासाठी काढलेल्या रॅलीमध्ये ते फक्त मराठा म्हणून उतरले. ते कोणत्याही पक्षाचे नव्हते. त्यात ना शिवसेना, भाजप, काँग्रेस ना राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्याच पक्षाचे लोक नव्हते. ते फक्त मराठा म्हणून मैदानात उतरले होते. त्यामुळे मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यालाही तसेच मैदानात उतरावे लागेल, असं देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ही इम्तियाज जलील यांनी केली आहे. तसेच हिमंत असेल तर राज्य सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी लावावी, असं थेट आव्हान देखील इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या रॅलीमध्ये मुंबईतील चांदिवली भागात दाखल झाले आहेत. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. 

रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक- इम्तियाज जलील

रॅलीबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला.

आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार- इम्तियाज जलील

काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले. रॅलीला परवानगी घेतलेली आहे. त्यानंतर यावर निर्बंधाबाबत आमच्याकडे काहीही अधिकृत पत्र आलेलं नाही, असं जलील म्हणाले.

Web Title: AIMIM chief Asaduddin Owaisi demands reservation for Muslim children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.