Join us

ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 6:04 AM

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचे निमंत्रण झाले आहे.

मुंबई : दिवाळीत संप पुकारून प्रवाशांना वारंवार वेठीस धरले जात आहे. विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारपासून संपाची हाक दिली आहे. त्यावरून इतर कर्मचारी संघटनांनी ते लबाडी करत असल्याचा आरोप केला आहे. प्रदीर्घ संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लिखित स्वरूपात लागू झाला म्हणून आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष केला व आता पुन्हा काम बंद आंदोलनाची नोटीस देणे ही दिशाभूल असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

आरोपांची राळमहाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचे निमंत्रण झाले आहे. बँकेच्या निवडणुकीतही सदावर्ते यांनी खोटी आश्वासने देत कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या नावाखाली बँक ताब्यात घेतली. कर्ज मिळत नाही, बँकेचा कॅश डिपॉझिट रेषो वाढला आहे. चमकोगिरीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा तुम्ही वापर करून घेत आहात का असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेएसटी संपएसटी