ऐन गणेशोत्सवात हार्बरचा प्रवास आगीतून फुफाट्यात; बेलापूर ते पनवेल प्रवाशांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 09:55 AM2023-09-21T09:55:55+5:302023-09-21T09:56:23+5:30
धावत धावत लोकल पकडायची आणि ही लोकल बेलापूरपर्यंत असल्याने त्यांची चांगलीच फरफट होत आहे
सुरेंद्र गांगण
मुंबई : सध्या हार्बर मार्गावर रात्रीकालीन ४५ दिवसांचा ब्लॉक आहे. मात्र, या ब्लॉकमुळे अनेकांचा खोळंबा होत आहे. सध्या गणपतीचा उत्सव असल्याने गावी जाणाऱ्यांची लगबग सुरु आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्ये रेल्वे मार्गावरील प्रवाशांना या रात्रकालीन ब्लॉकची माहिती नसल्याने त्यांनाही हार्बरवर मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
धावत धावत लोकल पकडायची आणि ही लोकल बेलापूरपर्यंत असल्याने त्यांची चांगलीच फरफट होत आहे. हार्बर लोकलनंतर सिटी बसचा प्रवास म्हणजे आगीतून फुफाट्यात म्हणाची वेळ प्रवाशांवर आली आहे. रिक्षा चालक आणि बसकडून लूट होत असल्याने अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, बेलापूर ते पनवेल प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रिक्षाचालकांनी तात्काळ भाडे वाढविले आहे. माणसी १०० रुपये आकारण्यात येत आहेत. तर एनएमएमटी सिटीबसनेही सुरुवातीला दोन दिवस टप्प्यानुसार आधी १० रुपये नंतर १४ रुपये तिकीट घेतले. आता सरसकट २० रुपये केले आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही रेल्वेचा पास काढला आहे. तर काहींनी तीन, सहा महिन्यांचा पास काढला आहे. त्यामुळे पासला आधीच पैसे मोजले आहेत. आता पनवेलपर्य़ंत प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. असे असूनही वेळेवर पोहोचता येत नाही, शिवाय त्रास आणि आर्थिक भारही पडत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल केला आहे.
घडलंय, बिघडलंय...
ऐन गणेशोत्सावात ४५ दिवसांचा ब्लॉक (२ ऑक्टोबरपर्यंत) घेऊन मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील प्रवाशांची क्रूर चेष्टा केली आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता आहे. त्यानंतर पनवेलच्या गाड्यांना बेलापूरलाच थांबा देण्यात आला आहे.
खचाखच, कोंबून बसचा प्रवास
बेलापूरला लोकमधून उतरल्यानंतर प्रवासी धावत पळत बस पकडत आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना बस पकडण्यास अडचण येत आहेत. त्यातच सिटीबस खच्चून भरल्याने त्रासासह कोंबून प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.आहे तेवढ्या बसेस कमी रात्री बारानंतर कामोठे, खारघर, पनवेलमध्ये जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे बेलापूरपासून सोडण्यात येणाऱ्या बसेसही कमी पडत आहेत. बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसताना लेकुरवाड्या महिला, ज्येष्ठ नागरिक उभे राहून प्रवास करतात. तर युवक बसच्या दारात उभे राहून आणि लटकून जीवघेणा प्रवास करताना दिसतात.
जीवघेणी कसरत
बेलापूर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर बसपर्यंत जाण्यासाठी लोकांना जीवघेणी कसरत करावी लागते. वाटेत पडलेले बांधकाम साहित्य, टीनपत्रे यातून कसरतीने वाट काढत बस पकडावी लागते.
तरुण मुले बेलापूरला उतरून धावत जाऊन बस पकडू शकतात. पण आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांचे काय? बस मिळाली तरी उभं राहून प्रवास करावा लागतो, एवढी गर्दी असते. आधीच लोकलचा त्रास आणि त्यात उभ्याने प्रवास - शंकर मिश्रा, व्यावसायिक
हार्बर लाईनवर लोकलचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने रोज रात्री घरी पोहोचायला दोन ते तीन वाजतात -वसू काकडे, युवक
रात्री दीडनंतर पनवेलमधील इतर भागात जाण्यासाठी ऑटोरिक्षा मिळत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मर्जीने मागेल तेवढे पैसे देऊन भुर्दंड सोसावा लागतो. - राहुल शिंदे, नोकरदार