मुंबई : वातानुकूलित बस सेवा ‘बेस्ट’साठी मात्र पांढरा हत्ती ठरली़ असे असतानाही नुकसान सहन करत गेली अनेक वर्षे ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. वर्षागणिक आर्थिक तूट वाढतच असल्याने अखेर या वातानुकूलित बस बंद करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. या वातानुकूलित बसचे रूपांतर साध्या बसेसमध्ये करण्यात येणार आहे.वातानुकूलित बसगाड्यांना अपेक्षित प्रवासी न मिळाल्याने हे बसमार्ग तोट्यात आहेत़ या बसगाड्यांच्या दुरुस्तीवर बेस्ट उपक्रमाला पाच वर्षांमध्ये पावणेतीन कोटी रुपये खर्च करावे लागले़ असे असले तरी इतर काही पर्याय वापरून ही सेवा नफ्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच होते. या प्रयत्नांना अपयश आल्यामुळे पहिल्या टप्प्यात २० वातानुकूलित बसगाड्या कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समितीपुढे दोन वर्षांपूर्वी मांडला होता़कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी या बसगाड्या भाड्याने देणे; तसेच इच्छुक कंपन्यांना या गाड्या विकण्याची तयारीही प्रशासनाने दाखविली होती़ मात्र सर्वच प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे बेस्टने अखेर वातानुकूलित बसगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ५ वातानुकूलित बसगाड्यांचे रूपांतर साध्या बसमध्ये करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
वातानुकूलित ‘बेस्ट’ अखेर बंद
By admin | Published: March 08, 2016 2:53 AM