वातानुकूलित बसगाड्या आगारांमध्ये धूळ खात
By admin | Published: April 19, 2016 02:44 AM2016-04-19T02:44:19+5:302016-04-19T02:44:19+5:30
बेस्ट उपक्रमासाठी पांढरा हत्ती ठरलेल्या ६० टक्क्यांहून अधिक वातानुकूलित बसगाड्या बस आगारांमध्ये धूळ खात उभ्या आहेत़ त्यामुळे ही बससेवा बंद करण्याची मागणी जोर धरत आहे़
मुंबई : बेस्ट उपक्रमासाठी पांढरा हत्ती ठरलेल्या ६० टक्क्यांहून अधिक वातानुकूलित बसगाड्या बस आगारांमध्ये धूळ खात उभ्या आहेत़ त्यामुळे ही बससेवा बंद करण्याची मागणी जोर धरत आहे़ त्यानुसार आगरात पडून असलेल्या वातानुकूलित बसगाड्या भाड्याने देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे़ तसेच या बससेवेचे भाडेही कमी करण्याचा विचार सुरू आहे़
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २७० वातानुकूलित बसगाड्या आहेत़ मात्र यापैकी केवळ १०२ बसगाड्या रस्त्यावर चालतात़ या बससेवेसाठी दररोज बेस्ट उपक्रमाला २७ लाख ५७ हजार ७८७ रुपये खर्च येतो़ या मोबदल्यात मात्र पाच लाख ४३ हजार ४३१ रुपये उत्पन्न बेस्टच्या तिजोरीत जमा होत आहे़ म्हणजे बेस्टला दररोज या बससेवेतून २२ लाख रुपयांचे नुकसान होत आहे़
त्या तुलनेत या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नगण्य आहे़ अनेक प्रयत्न करूनही बेस्ट उपक्रमाला या बससेवेकडे मुंबईकरांना आकर्षित करता आलेले नाही़ त्यामुळे आर्थिक संकट असलेल्या बेस्ट उपक्रमाने या पांढऱ्या हत्तीला पोसण्याची गरज काय? ही बस सेवा त्वरित बंद करण्याची मागणी काँगे्रसचे रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत उपस्थित केली़ (प्रतिनिधी)
> नियोजनशून्य कारभाराचा फटका
मुंबईनजीकच्या शहरांमध्ये वातानुकूलित बसगाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात़ बेस्टचे प्रवासी भाडे अधिक असल्याने प्रवासीवर्ग घटला आहे़ बेस्टच्या नियोजनशून्य कारभाराचा फटकाच या सेवेला बसला असल्याचा आरोप मनसेचे केदार हुंबाळकर यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला़