३१ मेपर्यंत वातानुकूलित लोकलची भाडेवाढ नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:45 AM2019-05-08T06:45:24+5:302019-05-08T06:45:37+5:30
रेल्वे मंत्रालयाने मे अखेरपर्यंत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३१ मेपर्यंत आहे त्याच किमतीत प्रवास करायला मिळणार आहे.
मुंबई : रेल्वे मंत्रालयाने मे अखेरपर्यंत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३१ मेपर्यंत आहे त्याच किमतीत प्रवास करायला मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्र्गावरून पहिली वातानुकूलित लोकल २५ डिसेंबर २०१७ रोजी सुरू झाली. त्याचे पहिल्या सहा महिन्यांचे कमीत कमी तिकीट ६० रुपये आणि जास्तीत जास्त तिकीट २०५ रुपये ठेवण्यात आले. तिकिटाची भाडेवाढ २५ जून २०१८ पासून करण्यात येणार होती. मात्र त्यानंतर सहा महिन्यांसाठी भाडेवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाडेवाढ होण्याची शक्यता होती. मात्र डिसेंबर महिन्यातही भाडेवाढ झाली नाही. तिकीट दरवाढीस डिसेंबर २०१८ पासून पुढील चार महिन्यांसाठी स्थगिती ुदिली. २४ मेपासून वातानुकूलित लोकलची भाडेवाढ करण्यात येणार होती.
मात्र पुन्हा भाडेवाढीला स्थगिती देण्यात आली असून ३१ मेपर्यंत तिकीट दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये वातानुकूलित लोकलमुळे १९ कोटी रुपयांचा महसूल पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे. एप्रिल २०१९ मध्ये १ कोटी ८४ लाखांंचा महसूल जमा झाला आहे.
थांबे वाढवले
पश्चिम रेल्वे मार्गावरील १ नोव्हेंबर २०१८ पासून लागू केलेल्या नवीन वेळापत्रकात वातानुकूलित लोकलला जास्त स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला. त्यात मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा या स्थानकांचा समावेश आहे.थांब्यात वाढ केल्यामुळे जादा महसूल रेल्वेला मिळाला आहे.