Join us

वातानुकूलित मिनी बसेस प्रवाशांसाठी ठरतात ‘बेस्ट’; अवघ्या सहा रुपयांत गारेगार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:28 AM

सहा महिन्यांत मिळाले ४८ लाख प्रवाशी

मुंबई : तिकिटांच्या दरात मोठी कपात केल्यानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आणलेल्या वातानुकूलित मिनी बस आता हिट ठरू लागल्या आहेत. अवघ्या सहा रुपयांत वातानुकूलित बसमधून गारेगार प्रवास करण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४८ लाख प्रवाशांनी आतापर्यंत एसी बसमधून प्रवास केल्याचे समोर आले आहे.

जुलै, २०१९ पासून बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडे किमान पाच ते २० रुपये केले आहे. विशेष म्हणजे, वातानुकूलित बसचा प्रवासही किमान सहा रुपये करण्यात आला. यामुळे काही दिवसांमध्येच वातानुकूलित बसमधून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांची बस थांब्यावर गर्दी होऊ लागली. सध्या बेस्टमार्फत चालविण्यात येणाऱ्या मिनी आणि मिडी वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून वातानुकूलित मिनी बसेसची मागणी वाढली आहे.

प्रवासी भाड्यामध्ये कपात केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने सप्टेंबर, २०१९ मध्ये वातानुकूलित मिनी बस आणल्या. त्यानुसार, सप्टेंबर ते जानेवारी या काळात मिनी बसेसमधून तब्बल ४८ लाख प्रवाशांनी आतापर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे या बसेसची संख्या आणखीन वाढविण्याचा विचार बेस्ट उपक्रम करीत आहे. विशेष करून छोट्या मार्गांवर या बसेस चालविण्यात येणार आहेत, तसेच रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकाशी ही सेवा जोडण्यात येणार आहे.

  • मिनी एसी बससेवा सप्टेंबर, २०१९ मध्ये बेस्ट उपक्रमाने दक्षिण मुंबईतून सुरू केली. या भागात एसी सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, बेस्ट उपक्रमाने अन्य मार्गांवर ही मिनी वातानुकूलित बससेवा सुरू केली.
  • सध्या बेस्ट उपक्रमामार्फत ३१७ मिनी वातानुकूलित बसेस ४२ बसमार्गांवर चालविण्यात येत आहेत. कुलाबा, वडाळा, वांद्रे, ओशिवरा आणि दिंडोशी या पाच बस आगारांमधून वातानुकूलित बससेवा चालविण्यात येत आहेत.
  • टॅक्सीसाठी प्रवाशांना किमान दहा रुपये मोजावे लागतात. त्याच वेळी वातानुकूलित बसमधून अवघ्या सहा रुपयांत प्रवास करता येतो, तसेच बेस्ट उपक्रमाने रेल्वे स्थानकांना जोडूनच ही बससेवा ठेवल्यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरत आहे.
  • मिनी वातानुकूलित बसमध्ये २१ आसन व्यवस्था असून सात प्रवासी उभे राहू शकतात. या बस सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत.

मंगळवारपासून सुरू केलेले नवीन वातानुकूलित मिनी बसमार्गए-३३७ आगरकर चौक(अंधेरी पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ(पहिली बस : ६ शेवटची: रात्री ११)ए-४४१: आगरकर चौक(अंधेरी पूर्व) ते म्हाडा वसाहत (मजास) पहिली बस : ६ शेवटची बस: रात्री १०.३०ए-३३८:आगरकर चौक(अंधेरी पू) ते सहार कार्गो संकुलपहिली बस:६ शेवटची: रात्री ११

टॅग्स :बेस्ट