Join us

एसी लोकलची हवा करतेय घामाघूम; साध्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने तारांबळ

By नितीन जगताप | Published: February 20, 2022 11:00 AM

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शुक्रवारपासून ४४ एसी लोकल सुरू झाल्या आहेत.

नितीन जगताप

मुंबई : मध्य  रेल्वे मार्गावर ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वे मार्गाच्या मुख्य मार्गावर ३४ वातानुकूलित लोकल सेवा आणि दोन विना वातानुकूलित (सामान्य) उपनगरीय सेवा वाढविण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर झाला आहे. शनिवारी लोकलला १५ ते २० मिनिटे उशीर झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२०  पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान दहा वातानुकूलित लोकल ट्रेन धावत आहेत. येत्या शुक्रवारपासून ठाणे- दिव्या पाचव्या-सहाव्या मार्गिका सुरू झाल्याने मध्य रेल्वेवर आणखी ३४  वातानुकूलित लोकल ट्रेनची भर होणार आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शुक्रवारपासून ४४ एसी लोकल सुरू झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेला ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. बहुप्रतीक्षित या ठाणे- दिव्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

एसी लोकलऐवजी सामान्य लोकल फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे. तेव्हाच सर्वसामान्य प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर मध्य रेल्वेने एसी लोकलचे भाडे करायला पाहिजे. एसी लोकलचे भाडे कमी करण्यासह अनेक सूचना मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र आतापर्यंत या सूचनेची दखल घेत नाही. परिणामी रेल्वे प्रवाशांनी या एसी लोकलकडे पाठ फिरवली आहे.नंदकुमार देशमुख,अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

प्रथम श्रेणी इतके तिकिट असायला हवेतमध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत; पण एखादी एसी लोकलला उशीर झाला तर त्याचा साध्या लोकलवर परिणाम होतो.  कार्यालय सुटण्याच्या वेळी उशीर झाल्याने सांयकाळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी कमी करण्यासाठी एसी लोकल तिकिटाचे दर हे साध्या लोकलच्या प्रथम श्रेणी इतके असायला हवेत. सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ

वेग निर्बंधामुळे उशीरदिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वे मार्गावर शनिवारपासून ४४ अतिरिक्त एसी लोकल सुरू केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव वेग निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गाड्यांना उशीर होत आहे. येत्या काही दिवसात हे वेग निर्बंध कमी केले जातील. - वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :रेल्वेदिवा