Join us

हवाई मालवाहतुकीने दाखविला आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:07 AM

२६ टक्के वाढ; वर्षभरात आलेखावर पहिल्यांदाच हिरवी रेघलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे गती मंदावलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला ...

२६ टक्के वाढ; वर्षभरात आलेखावर पहिल्यांदाच हिरवी रेघ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे गती मंदावलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला मालवाहतुकीने आशेचा किरण दाखविला आहे. मुंबई विमानतळावरून होणाऱ्या कार्गो वाहतुकीत मार्चमध्ये २६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच मालवाहतुकीच्या आलेखावर हिरवी रेघ उमटली आहे.

मार्च २०२० पासून विमान प्रवासावर वेळोवेळी निर्बंध लागू करण्यात आल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचे चक्र फारसे गतिमान झालेले नाही. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगारावर अनिश्चिततेचे सावट आहे. परंतु, या निराशाजनक वातावरणात मालवाहतुकीने आशेचा किरण दाखविला आहे. मुंबई विमानतळावरून मार्च २०२१ मध्ये ७०,५२७ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली. गेल्यावर्षी हा आकडा ५५,९३७ इतका होता.

मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीतील वाढ लक्षणीय आहे. मार्चमध्ये येथून ५१,५८९ मेट्रिक टन माल विविध देशांत पाठविण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ३०.७० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, तर देशांतर्गत कार्गो वाहतुकीत १५.१० टक्के (१८,९४८ मेट्रिक टन) वाढ झाली. मात्र, संपूर्ण वर्षभराचा विचार करता येथील एकूण मालवाहतुकीत ३१.४० टक्के घट झाल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

याव्यतिरिक्त देशातील मोठ्या विमानतळांवरील मालवाहतूकही गेल्या काही दिवसांत वाढली आहे. मार्चमध्ये दिल्ली ३४.९० टक्के, बंगलोर ४२.३०, हैदराबाद २४.३०, चेन्नई ४५.२०, कोलकाता ४३.५०, तर अहमदाबाद विमानतळावरून ६९.६ टक्के मालवाहतूक करण्यात आली.

.............

मुंबई विमानतळावरील मालवाहतूक

महिना...... आंतरराष्ट्रीय.... देशांतर्गत...... स्थिती

जानेवारी........ ४१,७२१ ........१७,५८०...... -१९.१०

फेब्रुवारी .........४४,२०९ ..........१६,७१८......... -१६.४०

मार्च .........५१,५७९ ......१८,९४८ ........ २६.१०

................

* कारणे काय?

फेब्रुवारीमध्ये कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने बहुतांश कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले. उत्पादनात वाढ झाल्याने साहजिकच मालवाहतुकीला गती मिळाली. भारतातून विदेशांत कोरोना प्रतिबंधक लसींची (प्रामुख्याने कोव्हिशिल्ड) झालेली वाहतूक हेही या वाढीमागील महत्त्वाचे कारण आहे. शिवाय आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर विविध देशांकडून सुरू झालेला मदतीच्या ओघ, आंब्यासारख्या हंगामी फळांची वाहतूक, आदी कारणांमुळे हा आकडा वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

----------------------------------