एअर इंडियाला रोखले

By admin | Published: September 22, 2015 12:24 AM2015-09-22T00:24:57+5:302015-09-22T00:24:57+5:30

अत्यंत चुरशीच्या व अखेरपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या थरारक सामन्यात ओएनजीसी संघाने बलाढ्य एअर इंडियाला ३-३ असे बरोबरीत रोखले

Air India blocked | एअर इंडियाला रोखले

एअर इंडियाला रोखले

Next

मुंबई : अत्यंत चुरशीच्या व अखेरपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या थरारक सामन्यात ओएनजीसी संघाने बलाढ्य एअर इंडियाला ३-३ असे बरोबरीत रोखले. दरम्यान, या अनपेक्षित बरोबरीनंतरही सक्षम गोलसरासरीच्या जोरावर एअर इंडियाने ‘ब’ गटातून मुंबई सुपर डिव्हिजनची अंतिम फेरीत ‘लँडिंग’ केले. त्याचवेळी ‘अ’ गटातील अन्य एका सामन्यात मध्य रेल्वेने अभी फाउंडेशनला ८-४ अशी जोरदार धडक दिली.
मुंबई हॉकी संघटेनेच्या (एमएचएएल) वतीने चर्चगेट येथील मुंबई हॉकी स्टेडियमवर झालेल्या लढतीत ओएनजीसीने जबरदस्त खेळ करताना एअर इंडियाला रोखण्याचा पराक्रम केला. ओएनजीसीच्या हर्षाहीब शमी याने ११व्या मिनिटाला वेगवान गोल केल्यानंटर एअर इंडियाच्या पवन कुमारने १५व्या मिनिटाला जोरदार प्रत्युत्तर देत लढत १-१ अशी बरोबरीत आणली. यानंतर पुन्हा ओएनजीसीने आक्रमक चाल रचताना अमित एम़ याने २४व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर मध्यंतराला २-१ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले.
विश्रांतीनंतर अयप्पन पी. आर याने ४९व्या मिनिटाला गोल करून एअर इंडियाला बरोबरी साधून दिली. तर यानंतर ओएनजीसीने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करताना दिवाकर रामने ५३व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर ३-२ अशी आघाडी घेतली. यावेळी एअर इंडिया ‘क्रॅश’ होण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र बलाढ्य एअर इंडियाने आपला हिसका दाखवताना भरारी घेली. पुन्हा एकदा पवनने आक्रमणाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना ५६व्या मिनिटाला निर्णायक गोल करून लढत ३-३ अशी बरोबरीत आणली. यानंतर दोन्ही संघांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून बरोबरी मान्य केली. या कामगिरीनंतर दोन्ही संघांचे प्रत्येकी १३ गुण झाले. मात्र एअर इंडियाने उत्तम गोलसरासरीच्या जोरावर बाजी मारली.
दुसऱ्या बाजूला ‘अ’ गटातील वेगवान खेळ झालेल्या लढतीत मध्य रेल्वेने अभी फाउंडेशनला ८-४ अशी धडक मारली. युवराज वाल्मिकीने रेल्वेच्या विजयात निर्णायक कामगिरी करताना एकट्याने तब्बल चार गोलचा वर्षाव केला. तर आफान युसूफ, विनीत कांबळे, दीपक लाक्रा आणि नारद बहादूर यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्याचवेळी पराभूत अभी फाउंडेशनकडून मनीष राणा याने सर्वाधिक २ गोल केले. तर रणजीत सिंग आणि दीपक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. अन्य एका सामन्यात मध्य सचिवालय संघाने प्रधान सोमन्ना याने नोंदवलेल्या तीन गोलच्या जोरावर स्पोटर््स अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया (साई) संघाचा ७-२ असा फडशा पाडला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Air India blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.