बुडत्या 'महाराजा'ला काडीचा आधार, मुंबईतील 'या' बिल्डिंगमुळे होतोय एअर इंडियाचा पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 09:40 AM2018-06-18T09:40:19+5:302018-06-18T09:40:19+5:30
एका बिल्डिंगमधून एअर इंडियाला मिळतं 100 कोटी रुपयांचं उत्पन्न
मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाला मरीन ड्राईव्हच्या 23 मजली इमारतीनं मोठा आधार दिला. सध्या एअर इंडियाला कर्मचाऱ्यांचे पगार देतानाही नाकीनऊ आले आहेत. मात्र सरकारसाठी पांढरा हत्ती ठरत असलेल्या एअर इंडियाला मरीन ड्राईव्हला असलेल्या 23 मजल्यांच्या पांढऱ्याशुभ्र इमारतीनं तारलं आहे.
मरीन ड्राईव्हला एअर इंडियाच्या मालकीची 23 मजली इमारत आहे. एअर इंडिया टॉवरचे बरेचसे मजले विविध कंपन्यांच्या कार्यालयांना भाड्यानं देण्यात आले आहेत. त्यातून एअर इंडियाला वर्षाकाठी 100 कोटींचं उत्त्पन्न मिळतं. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाते. एअर इंडियानं त्यांचं मुख्यालय नवी दिल्लीत हलवल्यानंतर मरिन ड्राईव्हमधील इमारतीतील बरेचसे मजले भाडे तत्त्वावर इतर कंपन्यांना दिले. सध्या या इमारतीमधील तळमजला रिकामा आहे. भारतीय महिला बँकेनं हा मजला जानेवारी महिन्यात रिकामा केला आहे.
23 मजली एअर इंडिया इमारतीमधील प्रत्येक मजल्याचं क्षेत्रफळ 10 हजार चौरस फूट इतकं आहे. इथल्या भाड्याचा विचार केल्यास एअर इंडियाला प्रति चौरस फूटामागे 350 रुपये मिळतात. भाड्याच्या माध्यमातून एअर इंडिया कंपनी प्रत्येक मजल्यामागे 35 लाख रुपये कमावते. सध्या या इमारतीतील तळमजल्याचा काही भाग एअर इंडियाच्या ताब्यात आहे. मरिन ड्राईव्हमधील इमारत कंपनीसाठी दुभती गाय असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. 'या इमारतीतून कंपनीला 100 कोटींचं उत्पन्न मिळतं. मात्र एअर इंडियाच्या 21 हजार कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याकाठी 200 कोटी रुपये इतका आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली. एअर इंडियामधून निर्गुंतवणूक करुन कंपनीची विक्री करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र अद्याप यासाठी खरेदीदार सापडलेला नाही.