मुंबई :विमानतळावर उतरल्यानंतर सर्वात जास्त वेळ जातो आपल्या लगेजची वाट पाहण्यात. हा कालावधी रटाळ असतो. आपले सामान नेमके आहे कुठे, याचीही नीट माहिती नसते. त्यामुळे खोळंबा होतो. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेत एअर इंडियाने प्रवाशांसाठी मोबाइलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या काही दिवसांत एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान गहाळ होणे, तुटणे आदी घटनांत वाढ झाल्यानंतर आता कंपनीने रिअल टाइम लगेज ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर, तसेच मोबाइल ॲपवरून प्रवाशांना आपल्या प्रवासादरम्यान आपले सामान नेमके कुठे आहे, हे तपासता येणार आहे.
विमानतळावर सामानाचे चेकइन केल्यापासून ते सामान विमानात चढवेपर्यंत आणि विमान उतरल्यानंतर विमानातून सामान बाहेर काढून प्रवाशांना मिळेपर्यंतची सर्व माहिती या वेबसाइट, तसेच ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मिळणार आहे. विमानतळावर सामान जमा केल्यानंतर पावतीवर असलेल्या बारकोडचे स्कॅनिंग केल्यानंतर प्रवाशांना ही माहिती समजू शकेल.