मुंबई : एअर इंडिया कंपनीच्या लंडनला गेलेल्या विमानातील हवाई सुंदरीवर लंडनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हल्ला झाल्याच्या घटनेचा कंपनीने तीव्र निषेध व्यक्त करतानाच कर्मचाऱ्यांच्या सुरेक्षबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्याशी कंपनीचे प्रतिनिधी सातत्याने संपर्कात असून, तिला योग्य ते उपचार देण्यासोबत याप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी स्थानिक पोलिसांशीदेखील संपर्कात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती रविवारी कंपनीने जाहीर केली आहे. एअर इंडियाचे विमान लंडन येथे गेल्यावर संबंधित विमानातील वैमानिक आणि हवाई सुंदरी यांची व्यवस्था तेथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
त्यावेळी एक बेघर व्यक्ती या महिलेच्या रूममध्ये शिरली आणि त्याने तिला मारहाण केली. ही मारहाण नेमकी का झाली, याचा तपास सुरू आहे. मात्र, या निमित्ताने पंचतारांकित हॉटेलमध्ये एखादी व्यक्ती अशा पद्धतीने शिरून मारहाण केल्यामुळे हॉटेलच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे.