Join us

एअर इंडियात १२० जागांसाठी भरती?... 'ती' जाहिरात निघाली खोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 6:37 PM

हल्ली नोकरीसंबंधीच्या जाहिराती सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल होतात.

ठळक मुद्देएअर इंडियात १२० जागांसाठी भरती निघाल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली.हल्ली नोकरीसंबंधीच्या जाहिराती सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल होतात. ही जाहिरात साफ खोटी असल्याचा खुलासा एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

भारतातील एअरलाइन कंपन्यांची आर्थिक स्थिती जरा बिकटच आहे. एअर इंडियाबद्दल तर न बोललंच बरं, अशी अवस्था आहे. सहा विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांना इंधन देणंही बंद केल्याची बातमी नुकतीच आली होती. असं असताना, या सरकारी कंपनीत १२० जागांसाठी भरती निघाल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. परंतु, ती पूर्णपणे खोटी असल्याचं एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी एफआरआय दाखल केला जाणार आहे. 

हल्ली नोकरीसंबंधीच्या जाहिराती सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल होतात. एअर इंडियातील भरतीची ही बोगस जाहिरातही अशीच पसरली. इच्छुकांनी रोहन वर्मा या व्यक्तीशी संपर्क साधावा आणि 'रिफंडेबल सिक्युरिटी अमाउंट' म्हणून ९,८०० रुपये आणि जीएसटीची रक्कम जमा करावी असं या जाहिरातीत म्हटलं होतं. या जाहिरातीवर 'एअर इंडिया बिल्डिंग, अकोला, सांताक्रूझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००४७' असा पत्ताही देण्यात आला होता. ही जाहिरात काहीशी संशयास्पद वाटल्यानं, एका नेटकऱ्यानं याबाबत थेट एअर इंडियालाच विचारणा केली. तेव्हा, हा सगळा गोलमाल असल्याचं स्पष्ट झालं. 

एअर इंडियामध्ये कुठलीही भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे ही जाहिरात साफ खोटी आहे. जाहिरातीत देण्यात आलेल्या पत्त्यावर आमची इमारतही नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध लवकरच एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सगळ्यांनीच अशा बोगस जाहिरातींपासून सावध राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

टॅग्स :एअर इंडियानोकरी