मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना जगात विविध ठिकाणी अडकलेल्या भारतीयांनाभारतात परत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा संबोधून त्यांना कोरोना विमा योजनेमध्ये अंतर्भूत करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनने ही मागणी केली असून याचा लाभ एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना त्वरित द्यावा अशी मागणी करणारे निवेदन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांना दिले आहे. भारतातील व जगातील अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद असल्याने जगाच्या विविध देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यांना घरी परतण्याचा मार्ग नसताना वंदे भारत मिशन अंतर्गत त्यांना हवाई मार्गे भारतात आणण्यात येत आहे. यामध्ये केवळ एअर इंडिया च्या विमानांचा वापर केला जात असल्याने एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भारतीयांना मायदेशी परतण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना विम्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली जात आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनचे अध्यक्ष प्रदीप मेनन यांनी याबाबत मंत्र्यांनी निर्णय घ्यावा व कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुऴे भविष्यात अशा घटना घडल्या तर कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा, सुरक्षितता मिळावी व केंद्र सरकार, राज्य सरकार कोरोनाशी लढण्यामध्ये योगदान देणाऱ्या डॉक्टर, पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे विमा सुरक्षा पुरवते त्याप्रमाणे एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेतल्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या धटना समोर आल्या आहेत त्यामुळे सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित याची अंमलबजावणी करावी असे फेडरेशनने निवेदनात नमूद केले आहे.