Join us

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, रनवेवरून विमान गेलं पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 6:52 PM

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळतोय.

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळतोय. या पावसाचा रेल्वे सेवेसह विमान सेवेलाही फटका बसला आहे. मुंबई विमानतळावरही एअर इंडियाचं विमान एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होता होता थोडक्यात बचावलं आहे. विमान रनवेवर उतरल्यानंतर घसरत पुढे गेल्याची घटना घडली आहे.या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. एअर इंडियाचं विजयवाडा-मुंबई विमान हे दुपारी 2.15च्या आसपास रनवेवर उतरलं. विशेष म्हणजे विमानाचं लँडिंग केल्यावर वैमानिकानं ब्रेक मारूनही विमान रनवेच्या पुढे गेले. त्यानंतर पुढे जाऊन ते विमान थांबले. विमान रनवे सोडून पुढे कसे गेले, याचा शोध अद्याप लागलेला नाही. या प्रकरणाची एअर इंडियाकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुंबईत कोसळणा-या पावसानं विमान सेवाही प्रभावित झाली आहे. अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. तर काही विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा उशिरानं सुरू आहे. दरम्यान, हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या रुळावर पावसाचं पाणी साचलं आहे. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे.  

टॅग्स :विमानतळ