मुंबई : एखादे विमान रद्द झाले, विलंब झाला तर अशा काळात विमान कंपनीतर्फे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांसदर्भात नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) निश्चित केलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला १० लाखांचा दंड ठोठावला असून कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली आहे.
डीजीसीएने जारी केलेल्या निवेदनानुसार, विमान प्रवासातील विलंब अथवा विमान रद्द होणे किंवा एखाद्या प्रवाशाला विमानात प्रवेश नाकारणे, अशा स्थितीत विमान कंपन्यांनी प्रवाशांना कोणत्या सुविधा द्यायला हव्यात या संदर्भात डीजीसीएने २०१० मध्ये एक धोरण निश्चित केले होते. गेल्या काही वर्षांत विविध घटनांच्या अनुषंगाने या धोरणांमध्ये बदल देखील करण्यात आले आहेत. हे बदल स्वीकारणे विमान कंपन्यांना बंधनकारक आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास मात्र, अलीकडेच या धोरणाची अंमलबजावणी विमान कंपन्यातर्फे कशा पद्धतीने होते याची पाहणी डीसीजीएच्या अधिकाऱ्यांनी केली.
देशातील अनेक महत्वाच्या विमानतळांवर ही पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एअर इंडिया कंपनीने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी करतानाच १० लाखांच्या दंडाची कारवाई केली आहे.