मुंबई - एअर इंडियाच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्रिचीहून दुबईला जाणारं विमान संरक्षक भिंतीला धडकलं. त्रिची विमानतळावरील ही घटना आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा विमानात 136 प्रवासी होते, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिची विमानतळावरुन विमानाने उड्डाण भरल्यानंतर एटीसीच्या संरक्षक भिंतीला विमानाची धडक बसली. विमानात 136 प्रवासी प्रवासी होते. अपघातानंतर वैमानिकाने पहाटे 5 वाजता मुंबई विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत.
अपघातानंतर सर्व प्रवासी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय केली जात आहे. अपघातानंतर मंत्री नटराजन यांनी विमानतळाला भेट देत दुर्घटनेची माहिती घेतली. अपघातामुळे विमानाचं प्रचंड नुकसान झाले आहे.