एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 05:17 AM2022-12-28T05:17:15+5:302022-12-28T05:17:44+5:30

विमानाची वेळ दुपारी सव्वातीनची असूनही रात्री साडेनऊपर्यंत विमानाने उड्डाणच केले नाही.

air india flight to dubai hangs for six hours passengers did not even get water | एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही

एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई :एअर इंडिया एक्स्प्रेस (आयके २४७) या विमानाने मुंबईतूनदुबईला जाणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी अत्यंत मनस्तापाचा सामना करावा लागला. विमानाची वेळ दुपारी सव्वातीनची असूनही रात्री साडेनऊपर्यंत विमानाने उड्डाणच केले नाही. त्यात भर म्हणजे, इंजिन बंद झालेल्या या विमानात एसी देखील बंद होता आणि अशा स्थितीत रन-वेवर उभ्या असलेल्या विमानात प्रवासी तब्बल तीन तास विमानात बसून होते. यामध्ये अनेक प्रवाशांचा जीव देखील गुदमरू लागला. शेवटी, विमानाला ओढून पुन्हा पार्किंग लॉटमध्ये नेण्यात आले. तिथे लोकांना विमानातून खाली उतरविण्यात आले. 

अडकलेल्या अनेक प्रवाशांनी एअर इंडियाच्या ट्विटरवर, फेसबुक पेजवर एवढेच नव्हे तर हवाई नागरी मंत्रालयाच्या पेजवर देखील प्रवाशांना झालेल्या त्रासाची माहिती कळवली. मात्र, तिथेही त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या विमानातून प्रवास करणारे ६६ वर्षीय अरुण चोडणकर यांचे पुत्र सौरभ चोडणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुळात या विमानाची नियोजित वेळ दुपारी सव्वातीन वाजता होती. याकरिता घरातून १२ वाजताच प्रवासी विमानतळावर पोहोचले. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर त्यांना विमानाचे उड्डाण सायंकाळी ६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. सहा वाजता विमान जेव्हा टॅक्सी वेवरून रन-वेच्या दिशेने आले तेव्हा ते मध्येच थांबले आणि त्यानंतर जवळपास तीन तास ते विमान तिथेच होते. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची जुजबी माहिती प्रवाशांना देण्यात आली.

मात्र, एसी यंत्रणा देखील बंद पडल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला यांना गुदमरायला झाले. प्रवाशांनी विमानाच्या दरवाज्यापाशी जाऊन खूप गोंधळ केल्यानंतर अखेर विमान एका पार्किंग लॉटमध्ये नेण्यात आले. तिथे प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. मात्र, नऊ तासांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या या प्रवाशांना विमान कंपनीने साधे पाणी देखील दिले नाही. तसेच बाथरूमची देखील व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना मनस्ताप झाल्याचे चोडणकर यांनी सांगितले. हे वृत्त लिहीपर्यंत विमानाने मुंबईतून उड्डाण केले नव्हते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: air india flight to dubai hangs for six hours passengers did not even get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.