लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन एअर इंडियाने देशांतर्गत विमान फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील विमानतळांवर विशेष नियोजन करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
एअर इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, औरंगाबाद आणि पुणे विमानतळावरून दिल्ली, अमृतसर आणि जामनगरसाठी विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई ते जामनगर आणि मुंबई ते अमृतसर थेट सेवा आठवड्यातून पाच दिवस चालविण्यात येईल. त्याशिवाय औरंगाबाद-दिल्ली, मुंबई-औरंगाबाद आणि पुणे-दिल्ली मार्गावर अतिरिक्त दैनंदिन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.
देशांतर्गत फेऱ्या वाढविताना एअर इंडियाने महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कारण देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांत राज्यातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या मार्गांवरील फेऱ्यांना अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही, तेथील फेऱ्या कमी करून त्या मुंबई-दिल्ली मार्गावर वळविण्याचे नियोजन असल्याचे एअर इंडियाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले.