लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांदरम्यान दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर अन्य प्रकारची वाहतूक होत असते. त्यामुळे दोन्ही शहरांना हवाईमार्गे जोडण्यासाठी एअर इंडियाने गेल्यावर्षी मार्चमध्ये विमान सेवा सुरू केली होती. मात्र, या सेवेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर ती बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
एअर इंडियाचे विमान दररोज सकाळी ११ वाजून ५ मिनिटांसाठी पुण्यासाठी उड्डाण करत होते आणि पुण्याला ११.५५ वाजता पोहोचत होते. तर पुण्याहून दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईसाठी निघून ते मुंबईत दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचत होते. विमानाची वेळ गैरसोयीची असल्यामुळे प्रतिसाद मिळत नव्हता.