मुंबई : एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने लंडनच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर ब्रिटनच्या लढाऊ विमानांच्या साहाय्याने हे विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले.
एअर इंडियाच्या बोईंग 777 फ्लाईट ए-191 ने मुंबईहून अमेरिकेच्या नेवार्कला उड्डाण केले होते. इंग्लंडच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ब्रिटिश फायटर जेट्सनी सुरक्षा लक्षात घेऊन एअर इंडियाचे विमान स्टॅनफोर्ड विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले. ट्वीटनुसार गुरुवारी सकाळी ही धमकी देण्यात आली होती. यानंतर हे विमान अमेरिकेच्या मार्गावरून वळविण्यात आले आणि इंग्लंडच्या विमानतळावर उतरविण्यात आले. हे विमान पोलिसांच्या सुरक्षेमध्ये सकाळी 10.15 वाजता उतरविण्यात आले. मात्र, तपासणीवेळी कोणतीही बॉम्बसदृष्य वस्तू आढळून आली नाही. यामुळे विमान पुन्हा नेवार्कसाठी रवाना झाले.
स्टॅनफोर्ड विमानतळानुसार मुख्य टर्मिनलवर या विमानाच्या आपत्कालीन लँडिंगमुळे काही परिणाम झाला नाही. एअर इंडियानेही याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. मात्र, थोड्यावेळाने हे ट्विट काढून टाकण्यात आले.