Air India Plane Crash: मॉर्निंग वॉकला आले की आपुलकीने हात दाखवायचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:38 AM2020-08-09T04:38:05+5:302020-08-09T04:39:04+5:30
सुरक्षारक्षकाने दिला आठवणींना उजाळा; दीपक साठे यांच्या मृत्यूमुळे चांदिवलीवर शोककळा
मुंबई : मॉर्निंग वॉकला आले की आपुलकीने हात दाखवायचे, असे सांगत दीपक साठे वास्तव्यास असलेल्या इमारतीतील सुरक्षारक्षकाने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. केरळच्या विमान अपघातात मृत्यू पावलेले पायलट कॅप्टन दीपक साठे हे पवई, चांदिवलीतील नाहर झिनिया इमारतीत कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या मृत्यूमुळे पवई, चांदिवली परिसरावर शोककळा पसरली आहे.
भारतीय वायू दलात विंग कमांडर असलेल्या साठे यांनी १९८१ ते २००३ या कालावधीत देशसेवा केली. वायू दलातून निवृत्त झाल्यानंतर २००३ साली ते एअर इंडियात रुजू झाले. केरळ येथील विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघी पवई विशेषत: चांदिवली हळहळली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, साठे यांच्या कुटुंबात दोन मुले आहेत. एक मुलगा बंगळुरूत, तर दुसरा अमेरिकेत वास्तव्यास आहे.
साठे वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षारक्षकाने ‘लोकमत’ला सांगितले की, ते इमारतीच्या कम्पाउंड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असत. आले की नेहमी आपुलकीने हात दाखवायचे. त्यांच्या पत्नी शनिवारी पहाटे ४ वाजताच केरळला निघाल्या आहेत. साठे यांच्या निधनाचे वृत्त समजताच लगतच्या परिसरात गर्दी झाली होती. इमारतीखाली येणारा प्रत्येक जण साठे यांच्याबाबत विचारपूस करत होता.
येथील सोसायटी सदस्य, सुरक्षारक्षक, घरकामगार महिला, लगतच्या परिसरात वास्तव्य करणारे राजकारणी आणि रहिवाशांनी साठे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. अतिशय मनमिळावू, गप्पिष्ट अशी त्यांची ओळख होती. लहान मुलांसोबतही त्यांचे छान जमत असे. सर्वांशी ते अतिशय स्नेहाने वागायचे. त्यांच्या कार्याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटायचा. आतासुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी विमानातील प्रवासी वाचवण्यासाठी प्रयत्न केले ते अभिमानास्पद आहे, असे सोसायटीतील सदस्यांनी सांगितले.
वायुसेनेचा मिळाला होता पुरस्कार
वायुसेनेचा पुरस्कार प्राप्त असलेले साठे यांचे ३० वर्षांचे करिअर दुर्घटनामुक्त आहे. केरळ येथील दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. कारकिर्दीतील ३० वर्षांतील १८ वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या सेवेसाठी दिली.
कामाप्रति निष्ठा : दीपक साठे हे १९९० च्या उत्तरार्धात भारतीय हवाई दलात असताना विमानाच्या दुर्घटनेतून बचावले होते, असे त्यांचे चुलत भाऊ नीलेश साठे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सहा महिने ते रुग्णालयात उपचार घेत होते. कामाप्रति निष्ठा, तीव्र इच्छाशक्ती यामुळेच बरे होऊन त्यांनी पुन्हा उड्डाण करण्यास सुरुवात केली होती, असे ते म्हणाले.