Join us

प्रवाशांच्या तक्रारींत एअर इंडियाचा क्रमांक वरचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:05 AM

डीजीसीएच्या अहवालातून उघड; परतावा मागणाऱ्यांची संख्या अधिकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या सेवेबाबत ...

डीजीसीएच्या अहवालातून उघड; परतावा मागणाऱ्यांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या सेवेबाबत प्रवाशांनी सर्वाधिक तक्रारी केल्या आहेत. नागरी उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) मे महिन्याच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

कोरोना काळात विमान कंपन्यांच्या सेवेबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मे महिन्यात प्रति १० हजार देशांतर्गत प्रवाशांमागे प्राप्त झालेल्या तक्रारींचे प्रमाण १.६० इतके नोंदविण्यात आले. त्यात एअर इंडियाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. एकूण तक्रारींपैकी एअर इंडियाच्या सेवेबाबत नोंद हरकतींचे प्रमाण ६.३, स्पाईस जेट २.७, ट्रू जेट ०.८, एअर एशिया ०.३, विस्तारा ०.३, तर इंडिगोच्या सेवेबाबत ०.१ प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

मे महिन्यात विविध विमान कंपन्यांकडे सर्वाधिक तक्रारी परताव्याबाबत (रिफंड) आल्या असल्या, तरी फ्लाईट प्रॉब्लेम आणि ग्राहक सेवेबाबत गाऱ्हाणे मांडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. एकूण तक्रारदारांपैकी ५४.१० (टक्के) जणांना परतावा मिळण्यात अडचणी आल्या, तर १६.३ जणांनी फ्लाईटबाबत हरकत नोंदवली. ग्राहक सेवेबाबत १५.१० टक्के, बॅगेज ३.६ आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीवर १५.१० टक्के तक्रारदारांनी आक्षेप घेतला.

......

दुसऱ्या लाटेदरम्यान दाखल तक्रारी (टक्क्यांमध्ये)

महिना... रिफंड... फ्लाईट प्रॉब्लेम... कस्टमर सर्व्हिस

मार्च.. ६५.७०.... ३.७०..... १९

एप्रिल... ७५.९० ... ५.३०... ७

मे... ५४.१०... १६.३०... १५.१०

.....

कारण काय?

कोरोना काळात हवाई प्रवाशांची संख्या घटल्यामुळे विमान फेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्या तत्काळ परतावा देण्यास असमर्थ ठरत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही रद्द तिकिटांचे पैसे मिळत नसल्याने प्रवासी तक्रारी करू लागले आहेत. शिवाय काही कंपन्यांनी कमी अंतराच्या विमानांत खानपान सुविधा बंद केल्याने ग्राहक सेवेबाबतच्या तक्रारी वाढल्याचे एका खासगी विमान कंपनीशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.