डेटा लीक प्रकरण; ग्राहकाने पाठवली नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाच्या ४५ लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर मुंबईस्थित एका ग्राहकाने एअर इंडियाला कायदेशीर नोटीस पाठवून १५ लाखांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. जमान अली असे या ग्राहकाचे नाव असून, ते वकील आहेत.
एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाल्याने जवळपास ४५ लाख प्रवाशांची माहिती चोरीला गेली. भारतासह विविध देशातील प्रवाशांचा यात समावेश आहे. या सायबर हल्ल्यामध्ये प्रवाशांची नावे, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती लीक झाली. परंतु, सीवीवी/सीवीसी नंबर हा डेटा प्रोसेसचा भाग नसल्याने मोठा धोका टळला. खबरदारीसाठी ग्राहकांनी क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलावा, असे आवाहन त्यानंतर एअर इंडियाने केले होते.
जमान अली यांनी माहिती-तंत्रज्ञान आणि ग्राहक संरक्षण अधिनियमांतर्गत एअर इंडियाला नोटीस पाठविली आहे. ग्राहकांची अत्यंत खासगी माहिती चोरीला जाणे ही गंभीर बाब असून, सक्षम प्राधिकरणामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. माहिती गहाळ झाल्यानंतर पासवर्ड बदलून काही उपयोग नाही. याआधारे बनावट पासपोर्ट, खोटी ओळखपत्रे बनवता येऊ शकतात. कार्ड क्लोनिंग पद्धतीचा वापर करून पैशांवरही डल्ला मारला जाऊ शकतो. शिवाय अनेक बेकायदेशीर कामांकरिता या माहितीचा वापर केला जाऊ शकतो, असे नोटिशीत म्हटले आहे.
* म्हणणे काय?
- वैयक्तिक माहिती गहाळ करणे, गोपनीयतेच्या अटींचा भंग करणे, डेटावरील नियंत्रण गमावणे आणि मानसिक त्रास देणे, या कारणांसाठी एअर इंडियाने मला भरपाई दिली पाहिजे.
- १० दिवसांच्या आत १५ लाखांची भरपाई देण्याबाबत नोटीस पाठविली आहे. तसे न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल. ग्राहकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याच्या जबाबदारीपासून त्यांना पळ काढता येणार नाही, असे अली यांनी म्हटले आहे.
* जबाबदार कोण?
सर्व ४५ लाख प्रवाशांची माहिती थेट एअर इंडियाच्या सर्व्हरमधून हॅक झाली नसून, त्यांची सेवादाता कंपनी असलेल्या ‘एसआयटीए’च्या सर्व्हरमधून लीक झाली आहे. त्यामुळे जमान अली यांच्या मागणीपासून अंग काढून घेण्यासाठी जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-------------------------------------