माझगावची हवा सर्वाधिक खराब, चेंबूर, अंधेरी, मालाड, बोरीवलीही प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:05 AM2021-02-08T04:05:32+5:302021-02-08T04:05:32+5:30
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. विशेषत: माझगाव, मालाड, बोरीवली, अंधेरी आणि चेंबूर परिसरात ...
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. विशेषत: माझगाव, मालाड, बोरीवली, अंधेरी आणि चेंबूर परिसरात सातत्याने हवा प्रदूषित नोंदविण्यात येत असून, रविवारीदेखील या परिसरात कमालीच्या प्रदूषणाची नोंद झाली आहे. माझगाव येथील हवा सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आली असून, त्या खालोखाल चेंबूर, अंधेरी, बोरीवली आणि मालाड येथील प्रदूषणाचा आलेख वाढला आहे.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारला होता. जसे जसे लॉकडाऊन शिथिल होत गेले तसतसा हवेच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा खालावू लागला. जानेवारी सुरू होतानाच मुंबईची हवा प्रदूषित नोंदविण्यात आली होती. त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस, वाढलेली थंडी आणि ढगाळ वातावरण अशा हवामान बदलाने मुंबई तब्बल आठवडाभर प्रदूषित नोंदविण्यात आली. त्यानंतर हवेचा दर्जा मध्यम स्वरूपाचा नोंदविण्यात आला.
आता कमाल आणि किमान तापमानात चढउतार नोंदविण्यात येत असतानाच पुन्हा एकदा हवा बिघडली आहे. विशेषत: आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली आहे. प्रदूषणात भर पडली आहे. याव्यतिरिक्त बंद असलेले कारखाने, उद्योग पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. शिवाय बांधकाम उद्योगही सुरू झाला असून, इमारतीच्या निर्माणाधीन कामांनी वेग पकडला आहे. त्यामुळे वातावरणात धुळीचे कण पसरत आहेत. याव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरात रस्त्यांची, पुलांची कामे सुरू झाली आहेत. या बांधकामातून उठणारी धूळ वातावरणात पसरत आहे.
अशा विविध कारणांमुळे मुंबई वातावरणात धुळीच्या कणांची नोंद अधिक होत आहे. धूळ, धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार होणारे धुरके दृश्यमानता कमी करत असून, दृश्यमानता कमी होण्याचे प्रमाण वांद्रे-कुर्ला संकुलासह वांद्रे-वरळी सी लिंक, विमानतळ परिसरासह लगतच्या परिसरात अधिक आहे. वातावरणात उठणारी धूळ कमी करण्यासाठी म्हणजे बांधकाम, उद्योगातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने मुंबईतला प्रदूषणाचा स्तर सातत्याने वाढता नोंदविण्यात येत आहे.
.........................
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
पीएम २.५ ( पार्टिक्युलेट मॅटर, अतिसूक्ष्म धुळीच्या कणांचे प्रमाण)
कुलाबा ९८ समाधानकारक
माझगाव ३०३ अत्यंत खराब
वरळी १२१ मध्यम
बीकेसी १९० मध्यम
चेंबूर २०८ खराब
अंधेरी २६९ खराब
भांडूप ६८ समाधानकारक
मालाड २४९ खराब
बोरीवली १६६ खराब