लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही दिवस पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता १३ लाख ३४ हजार ७६६ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आता आठ टक्के जलसाठा वाढण्याची प्रतीक्षा आहे.
मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. वर्षभर मुंबईत सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे चार तलाव भरून वाहू लागले. ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला नाही. वर्षभराचा पाणीप्रश्न मिटण्यासाठी आता एक लाख १२ हजार ५९७ दशलक्ष लीटर जलसाठा कमी पडत आहे.
अन्यथा पाणी कपातीची शक्यता
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस झाल्याने २१ ऑगस्टला पाणी कपात १० टक्के करण्यात आली. २०१८मध्ये पाणीसाठ्यात नऊ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के कपात करण्यात आली होती. पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित आठ टक्के जलसाठा जमा न झाल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
६ सप्टेंबर २०२१ रोजी
जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )
तलाव.. कमाल.. किमान .. उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३.२६ ११६७०६ १६१.६४
तानसा १२८.६३ ११८.८७ १४४४७५ १२८.६०
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.२७
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२२
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ १८२९४१ ६०२.१४
भातसा १४२.०७ १०४.९० ६७०१२२ १४०.३६
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८४७७८ २८३.४४
वर्ष..... जलसाठा (दशलक्ष लीटर) ... टक्के
२०२१ - १३३४७६६ .... ९९.२२
२०२० - १४१६३६७ ... ९७.८६
२०१९ - १४१९७५५ ... ९८.०९