मुंबई विमानतळ; इतर राज्यांतून येणाऱ्यांना मात्र अहवाल बंधनकारक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विमानतळावर प्रवेश केल्यानंतर सादर कराव्या लागणाऱ्या कोरोना अहवालाच्या बंधनातून महाराष्ट्रातील प्रवाशांना मुक्त करण्यात आले आहे. मात्र, इतर राज्यांतून येणाऱ्यांना अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल सादर केल्याशिवाय मुंबई विमानतळावर प्रवेश दिला जात नाही. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने देशांतर्गत विमान प्रवाशांवरही निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार सुरुवातीला दिल्ली, राजस्थान, गोवा, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना अहवाल बंधनकारक करण्यात आला हाेता. मात्र, एप्रिलच्या मध्यात देशात कोरोना उद्रेकाची तीव्रता वाढल्याने खबरदारी म्हणून सर्व राज्यांतील प्रवाशांना अहवालाची सक्ती करण्यात आली. या अहवालाची कालमर्यादा केवळ ४८ तासांपुरती वैध ठरविण्यात आली.
आता राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे. त्यानुसार, सर्व आढावा घेतल्यानंतर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी विमानतळ प्राधिकरणास आदेश देऊन राज्यातील प्रवाशांना कोरोना अहवालसक्तीतून वगळण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील प्रवाशांना तशी सूट देण्यात येणार आहे. मात्र, इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
........