मुंबई : दिवाळीच्या आगमनापासून मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचे ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शहर आणि उपनगरात हवेची गुणवत्ता खालावल्याने दिल्लीसारखी मुंबईतील हवेची स्थिती झाल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. अंधेरीत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर असल्याचे ‘सफर’ संकेतस्थळावर नोंदवण्यात आले आहे. अंधेरीत धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर/पीएम) प्रमाण प्रचंड वाढल्याने येथील हवा अतिप्रदूषित झाल्याचे दिसून आले.मुंबईत धनत्रयोदशीच्या दिवसापासून फटाके फोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि शुक्रवारी भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने हवेच्या गुणवत्तेने धोकादायक पातळी गाठली आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.मुंबईतील एकूण हवेची गुणवत्ता ३०८ एक्यूआय नोंदविण्यात आली होती; तर अंधेरीमधील धूलिकणांचे प्रमाण ४४९ पीएम नोंदविण्यात आले. हे प्रमाण अतिशय धोकादायक पातळीमध्ये असल्याचे ‘सफर’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. शुक्रवारी मुंबईतील एकूण हवेची गुणवत्ता २४२ एक्यूआय नोंदविण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाकडून फटाके फोडण्याची वेळ देण्यात आली होती. मात्र या वेळेचे पालन न केल्याने मुंबईतील हवेत फटाक्यांचे रासायनिक कण, धूर मिसळून पार्टिक्युलेटर मॅटर २.५ ची संख्या वाढली आहे.मुंबईवर धूळ, धूके, धूर यांच्या एकत्रित मिश्रणाने धूरके तयार झाले आहेत. त्यामुळे धूरक्यांची चादर मुंबापुरीवर पसरलेली आहे. यात फटाके वाजविण्याचे प्रमाण वाढल्याने रासायनिक कण आणि धूर हवेत मिसळला जात आहे. त्याचप्रमाणे खोदकाम, बांधकाम, दिवसरात्र वाहतूक, झाडांची कत्तल या कारणामुळे धूलिकण वाढत आहेत. पुढील आठवडाभर धूलिकणांच्या संख्येचा आलेख वाढता असल्याचे वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले.वाहनांची वाढती संख्या, वाढती बांधकामे, इतर प्रदूषण, फटाक्यांमुळे वातावरणावर धूरक्यांचे सावट आहे. धूळ, धूर, धूके वातावरणाच्या खालच्या स्तरावर साचत आहे. शहर आणि उपनगरातील तापमानात कमाल आणि किमान यामध्ये बरीच तफावत असून तापमानात सातत्याने बदल नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण होत असलेले धूरके धोकादायक ठरत आहे.लहान मुले, गरोदर महिला, वृद्धांसाठी धूरक्याचे वातावरण धोकादायक असून यावर उपाय म्हणून तोंडाला मास्क लावणे, त्वचेला तेल लावणे, डोळे वेळोवेळी पाण्याने धुणे, संसर्ग टाळणे, आजार होण्याअगोदर प्रतिबंधात्मक उपचार करणे गरजेचे असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.न्यायालयाच्या निर्देशानंतरही पहाटे तसेच रात्री उशिरा अनेक मुंबईकरांनी फटाके फोडले. त्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी ते प्रदूषणास कारणीभूत ठरले.
फटाक्यांमुळे मुंबईची हवा प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 7:19 AM