नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा दूषित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:03 AM2019-11-20T00:03:44+5:302019-11-20T00:04:03+5:30
‘सफर’ची माहिती; मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढले
- सचिन लुंगसे
मुंबई : एकीकडे मुंबईकरांना थंडीचे वेध लागले असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत आहे. हवेची गुणवत्ता नोंदविणाऱ्या ‘सफर’ या संकेतस्थळावर मंगळवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मधील हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल नवी मुंबई आणि माझगावच्या हवेत सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. एका अर्थाने बीकेसी, नवी मुंबई आणि माझगाव येथील हवा वाईट असून, चेंबूरसारख्या प्रदूषित परिसरातील हवा मात्र समाधानकारक असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.
वायुप्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत असून, दिल्लीप्रमाणेच मुंबई, कोलकाता, चेन्नईसारखी शहरेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. यातून त्यांना बाहेर पडता यावे म्हणून दिल्ली सरकारसह उर्वरित शहरांतील संबंधित प्राधिकरणांनी कृती आराखडा कार्यक्रम हाती घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र हे आराखडे अद्यापही कागदावरच आहेत. परिणामी मुंबईसारख्या शहरांची बिघडणारी हवा सुधारणार कधी, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता मुंबई शहरात माझगाव, पूर्व-पश्चिम उपनगराला जोडून असलेले वांद्रे-कुर्ला संकुल, पश्चिम उपनगरातील अंधेरी आणि पूर्व उपनगरातील चेंबूर या परिसरातील वातावरण सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. विशेषत: मुंबईशिवाय नवी मुंबईही सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, मुंबईसह नवी मुंबई परिसरातील हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वरचढच नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांच्या नोंदी पाहिल्या असता मुंबई शहर आणि उपनगरातील हवा समाधानकारक नोंदविण्यात येत असली तरी नवी मुंबईमधील हवा अत्यंत वाईट नोंदविण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेदेखील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो केंद्राकडे सादर केला आहे. मात्र हा आराखडा परिपूर्ण नसल्याचे वातावरण फाउंडेशनचे म्हणणे आहे. कृती आराखड्यात अनेक घटकांना बगल देण्यात आली आहे.
नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे गरजेचे
मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असते. वाहनांची संख्या वाढत असल्याने साहजिकच ध्वनी आणि वायुप्रदूषणातही भर पडते. वाहनांची संख्या कमी व्हावी, सायकलचा वापर वाढावा, प्रत्येकाने सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर द्यावा म्हणून सामाजिक संस्थांसह प्रशासनाकडूनही सातत्याने प्रयत्न केले जातात. मात्र केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही तर नागरिकांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित असताना तो मिळत नाही. परिणामी, समस्या सुटण्याऐवजी त्यात भरच पडत असल्याचे मत वातावरण फाउंडेशनचे अध्यक्ष भगवान केशभट यांनी व्यक्त केले.
हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)
बीकेसी : ३०१ अत्यंत वाईट
नवी मुंबई : २३९ वाईट
माझगाव : २०२ वाईट
बोरीवली : १२४ मध्यम
मालाड : १६१ मध्यम
भांडुप : ८२ समाधानकारक
अंधेरी : १४३ मध्यम
चेंबूर : ९५ समाधानकारक
वरळी : १४६ समाधानकारक
कुलाबा : ९३ समाधानकारक