मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली; गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील हवा वाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 11:40 AM2024-10-10T11:40:48+5:302024-10-10T11:41:28+5:30
बुधवारी सायंकाळी आलेल्या हलक्या सरींमुळे हवेमधील प्रदूषके पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात रात्री रिमझिम पाऊस सुरू झाला असतानाच सकाळी व दुपारी मुंबईवर गोळा झालेल्या प्रदूषकांनी पुन्हा मुंबईला वेढल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रदूषकांत वाढ झाली असल्याची माहिती आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली यांनी दिली. बुधवारी सकाळीही गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील हवा वाईट नोंदविण्यात आल्याचे सुमेरा यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी आलेल्या हलक्या सरींमुळे हवेमधील प्रदूषके पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली. गेल्या काही दिवसांपासून बीकेसी, गोवंडी आणि शिवडी परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे.
थंडीतही प्रदूषण कायम?
मान्सूनचा कालखंड संपत असतानाच प्रदूषणात झालेली वाढ संपूर्ण थंडीत कायम राहील, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी वर्तविली आहे. धूर, धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार होणारे धुरके मुंबईत सातत्याने पसरत आहे. रस्त्यांची सुरू असलेली कामे, इमारतींची बांधकामे आणि वाहनांचा धूर या प्रदूषणास कारणीभूत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. पर्यावरण अभ्यासकांनी पीएम २.५ या विभागवारीमधील प्रदूषकांची नोंद घेतली असून, ही प्रदूषके आरोग्यास घातक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४५ ते ९० या विभागवारीत नोंदविण्यात आला होता. ही हवेची गुणवत्ता सरासरी होती. तर ८ ऑक्टोबर रोजी हवेच्या गुणवत्तेने धोकादायक पातळी ओलांडली होती.
९ ऑक्टोबरची हवेची गुणवत्ता
ठिकाण प्रदूषके गुणवत्ता
शिवाजीनगर २१० वाईट
शिवडी १९६ मध्यम
भायखळा १२५ मध्यम