स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार; वातावरण फाउंडेशनच्या माध्यमातून साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 02:18 AM2020-09-09T02:18:04+5:302020-09-09T06:53:07+5:30
आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन
मुंबई : वायुप्रदूषणाच्या धोक्याला ओळखून योग्य ती पावले उचलावी लागतील. जर यावर वेळीच उपाय केले गेले नाहीत तर येणाऱ्या पिढीला स्वच्छ श्वास घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
येणाºया पिढीच्या भविष्यासाठी स्वच्छ हवेचा वसा आपल्याला जपून ठेवावा लागेल, असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त भारत गणेशपुरे यांनी वातावरण फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वातावरण फाउंडेशनद्वारे स्वच्छ हवेसाठी चालवल्या जाणाºया #साफ श्वास २४ तास या अभियानाला गणेशपुरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडील माहितीनुसार, जगभरात दरवर्षी वायुप्रदूषणामुळे ७० लाख लोकांचा मृत्यू होतो आणि लँन्सेंट हेल्थ जर्नलनुसार महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लाख लोक वायुप्रदूषणाला बळी पडतात. येणाºया काळात हे संकट अधिकच गंभीर होईल याची शक्यता नाकारता येत नाही. वायुप्रदूषण आणि तापमान वाढ हे आजच्या काळातील जगासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तापमान वाढीत वायुप्रदूषण हे भर घालते. जगभरात सर्वाधिक प्रदूषित असणारे शहर हे भारतात आहे. ही बाब नक्कीच भूषणावह नाही.
नॉनअटेन्मेंट म्हणजेच राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानांकनाची लक्ष्ये न गाठता येणाºया शहरांची संख्या भारतात १०२ इतकी आहे. हवा प्रदूषणामध्ये देशभरात महाराष्ट्र हे आपले राज्य अव्वल स्थानी आहे. एकट्या महाराष्ट्रात १८ शहरे ही पर्यावरणीय आरोग्याच्या बाबतीत व्हेंटिलेटरवर आहेत. तज्ज्ञांच्या मते वायुप्रदूषणाचा लहान मुलांच्या आरोग्यावर सर्वाधिक गंभीर दुष्परिणाम होत असतो. याची पुनरावृत्ती भविष्यात टाळायची असेल तर, हरित ठिकाणांचे संवर्धन आणि प्रदूषणावर नियंत्रण हा मूलमंत्र सर्वांनी अंगीकारला पाहिजे.