वाढत्या विमान संख्येमुळे हवाई वाहतूक नियंत्रकांचा ताण वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:34 AM2019-03-05T00:34:15+5:302019-03-05T00:34:25+5:30

भारत व पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर बंद करण्यात आल्याने मुंबई हवाई विभागातून प्रवास करणाऱ्या विमानांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.

Air traffic controllers have increased due to the increasing number of aircrafts | वाढत्या विमान संख्येमुळे हवाई वाहतूक नियंत्रकांचा ताण वाढला

वाढत्या विमान संख्येमुळे हवाई वाहतूक नियंत्रकांचा ताण वाढला

Next

- खलील गिरकर 

मुंबई : भारत व पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर बंद करण्यात आल्याने मुंबई हवाई विभागातून प्रवास करणाऱ्या विमानांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रकांच्या (एटीसीओ) कामात व त्यामुळे ताणामध्ये प्रचंड वाढ झाली. याबाबत, एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड (वेस्टर्न रिजन) एटीसी गिल्डने एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाला (एएआय) पत्र लिहून याबाबत उपाययोजना आखण्याची सूचना केली आहे.
पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर २८ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला होता. सोमवारी ही हवाई हद्द सुरू करण्यात आली. मात्र यादरम्यान आलेल्या विविध अनुभवांवर एटीसी गिल्डने एएआयचे लक्ष वेधले आहे. रडार, आॅटोमेशन व कम्युनिकेशन्स यंत्रणेत अत्याधुनिक यंत्रणा लागू करण्याची सूचना संघटनेनेने केली आहे.
देशातील हवाई वाहतुकीत लक्षणीय वाढ होत असल्याने देशातील हवाई क्षेत्रातील विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे एटीसीओच्या कामात प्रचंड वाढ झाली आहे. हवाई वाहतूक नियंत्रणामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी (व्हीएचएफ) व हाय फ्रिक्वेन्सी (एचएफ) च्या सुमार दर्जामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होण्याची भीती असते. मुंबईतील सेक्टरमध्ये वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अतिरिक्त रडार, अतिरिक्त वरिष्ठ एटीसीओ अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
ओशियॅनिक कंट्रोलच्या हद्दीतील कॉन्टिनेन्टल एअरस्पेसमध्ये एटीसीओंना ५० विमानांची वाहतूक नियंत्रित करावी लागते. एटीसीओंना साधारणत: ७ तास काम करावे लागते.
>मुंबई एटीसीची हद्द
पूर्वेला १५० नॉटिकल मैल औरंगाबादपर्यंत
उत्तरेला १२० नॉटिकल मैल अहमदाबादपर्यंत
दक्षिणेला १५० नॉटिकल मैल चेन्नईपर्यंत
पश्चिमेला ६०० नॉटिकल मैल ओमान व माले मॉरिशसपर्यंत
>‘एएआय’ला करण्यात आलेल्या शिफारशी
लोअर एरिया कंट्रोल सेक्टरचे काम २४ तास सुरू ठेवावे, औरंगाबाद व सुरतमध्ये लोअर एरिया कंट्रोल सेक्टर उभारावे, प्रत्येक सेक्टरची सेक्टर क्षमता तपासावी, अ‍ॅप्रोच अरायव्हल व डिपार्चरमध्ये २४ तास विभाजन करावे अशा विविध शिफारशी गिल्डने एएआयला केल्या आहेत. सध्या ३५० एटीसीओ हवाई वाहतुकीचे नियंत्रण करतात, प्रत्यक्षात ६२५ एटीसीओंची गरज आहे.
इनरुट कंट्रोलमध्ये सध्या उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम व उत्तर पूर्व-पश्चिम असे ३ सेक्टर आहेत. त्यामध्ये आणखी एक सेक्टर वाढविणे गरजेचे आहे. अ‍ॅप्रोच कंट्रोलमध्ये सध्या अरायव्हल व डिपार्चर असे २ सेक्टर आहेत. त्यामध्ये फायनल अ‍ॅप्रोचसाठी आणखी एक सेक्टर गरजेचे आहे. ओशियॅनिक कंट्रोलमध्ये सध्या ३ सेक्टर आहेत. त्यामध्ये आणखी एक सेक्टर वाढवण्याची गरज आहे.

Web Title: Air traffic controllers have increased due to the increasing number of aircrafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.