लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैद्यकीय साहित्याची जलद वाहतूक करून आरोग्य क्षेत्राला बळ देणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्राने लस वहनातही आपल्या मदतकार्याचा ठसा उमटविला आहे. विविध विमान कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत १४ कोटी ४२ लाख लस मात्रांची (डोस) वाहतूक करण्यात आली आहे.
हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात वैद्यकीय साहित्याच्या वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावर मात करण्यात आली. शिवाय आतापर्यंत जवळपास १४ कोटी ४२ लाख लस मात्रा विविध राज्यांना पोहोचवण्यात हवाई वाहतूक क्षेत्राने मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी ९४४ विमानांचा वापर करण्यात आला. त्याचे सरासरी वजन ७५९.५२ मेट्रिक टन इतके होते. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत हवाई मार्गाने १ हजार टन वैद्यकीय साहित्य आणि अत्यावश्यक मालाची वाहतूक केली, असेही त्यांनी सांगितले.