विमान प्रवास आणि एअर टर्ब्युलन्स; वातावरणातील बदलांमुळे विमानात बसताहेत हादरे

By मनोज गडनीस | Published: June 2, 2024 09:05 AM2024-06-02T09:05:49+5:302024-06-02T09:06:03+5:30

ही परिस्थिती पावसाळ्यात अनुभवास येत होती. आता मात्र कोणत्याही ऋतूमध्ये असे प्रकार घडू लागले आहे. त्यामध्ये लोकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एअर टर्ब्युलन्स ही डोकेदुखी झाली आहे. 

Air travel and air turbulence; Changes in the atmosphere cause vibrations in airplanes | विमान प्रवास आणि एअर टर्ब्युलन्स; वातावरणातील बदलांमुळे विमानात बसताहेत हादरे

विमान प्रवास आणि एअर टर्ब्युलन्स; वातावरणातील बदलांमुळे विमानात बसताहेत हादरे

गेल्या पंधरा दिवसांत दोन विमानांना प्रवासादरम्यान जोरदार हादरे बसले आणि त्यापैकी एका घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दोन्ही घटनांत मिळून ३२ प्रवासी गंभीर जखमी झाले. विमान प्रवासादरम्यान बाहेरील वातावरण खराब असेल तर वैमानिक आपल्याला सीट बेल्ट लावण्याची सूचना करतो आणि मग विशिष्ट वातावरणाचा टप्पा जेव्हा विमान ओलांडत असते त्यावेळी आपल्याला हादरे बसण्यास सुरुवात होते. ही परिस्थिती पावसाळ्यात अनुभवास येत होती. आता मात्र कोणत्याही ऋतूमध्ये असे प्रकार घडू लागले आहे. त्यामध्ये लोकांचा मृत्यू किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे एअर टर्ब्युलन्स ही डोकेदुखी झाली आहे. 

एअर टर्ब्युलन्स म्हणजे काय?
समुद्रात ज्या प्रमाणे महाकाय लाटा असतात त्याचप्रमाणे हवेतदेखील शक्तिशाली ढगांचे तुकडे असतात. त्या ढगांमधून जेव्हा जोराने वाहणारा वारा आत जातो त्यावेळी त्या ढगांमध्ये अंतर्गत ढवळाढवळ होत असते. अशा ढगांतून जेव्हा विमान जाते त्यावेळी त्या ढवळाढवळीचा फटका प्रवाशांना हादरे बसण्याच्या रूपाने बसतो. माजी वैमानिक के. एम. कृष्णकांत यांनी सांगितले की, एअर टर्ब्युलन्स ही स्थिती प्रामुख्याने तीन वेळा निर्माण होते. पहिली स्थिती हवेतील उष्णता वाढते तेव्हा निर्माण होते. दुसरी स्थिती पर्वतरांगांमध्ये वारा अडकला तर तेव्हाही एअर टर्ब्ल्युलन्स सोसावा लागतो. तिसरी स्थिती म्हणजे वारामिश्रित ढगांचा हवेत सैरावैरा संंचार होतो त्यावेळी अनुभवण्यास मिळते. 

हादरे का बसतात?
विमाने किमान ४० ते कमाल ६० हजार फुटांवरून उड्डाण करत असतात. तसेच गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात विमान प्रवास करत असल्यामुळे त्याचा वेगदेखील प्रचंड असतो. अशा वेळी एखादा वारामिश्रित ढग (ज्यालादेखील स्वतःचा एक वेग आहे) समोर येतो, तेव्हा या दोन्ही घटकांची अक्षरशः टक्कर होते आणि त्यातून हादरे बसण्यास सुरुवात होते. 

वातावरणातील बदलांचा फटका
वातावरणातील बदलांमुळे एअर टर्ब्युलन्स वाढत आहे का, या विषयावर युकेतील एका विद्यापीठाने अभ्यास केला होता. १९७५ पासून आतापर्यंत तापमानात १.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. १.१ टक्क्यांच्या या वाढीमुळे वाऱ्याच्या वेगात किमान २ टक्के वाढ झाली आहे. २००९ ते २०१८ या कालावधीमध्ये विमानांच्या एकूण अपघातांपैकी एक तृतीयांश अपघात हे एअर टर्ब्ल्युलन्समुळे झाल्याचे दिसून येत आहे. 

हे किती धोकादायक आहे?
विमान प्रवासादरम्यान नेहमीच उड्डाणांच्या जागेवरील वातावरण तपासले जाते. मात्र, वातावरणात कोणत्याही क्षणी बदल होऊ शकतात. त्यामुळे विमान जेव्हा प्रवासात असते, त्यावेळी समोर अचानक एअर टर्ब्युलन्सची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फटका विमानाला आणि पर्यायाने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसू शकतो. विमान भरकटण्याची शक्यता असते, विशिष्ट उंचीवरून ते वेगाने खाली येण्याची शक्यता असते. अशा स्थितीत नियंत्रण सुटले तर भीषण अपघात होऊ शकतो.

Web Title: Air travel and air turbulence; Changes in the atmosphere cause vibrations in airplanes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान