लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला, तरी विमान इंधनाने मात्र निराशाच केली आहे. गेल्या महिनाभरात एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचे (एटिफ) दर सुमारे नऊ टक्क्यांनी वाढले असून, चालू वर्षात ते ६३ टक्क्यांनी महागले आहे. त्यामुळे हवाई वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली, तरी विमान प्रवास स्वस्त होण्याची आशा धूसर झाली आहे.
मुंबईत १ एप्रिल २०२२ रोजी विमान इंधनाचे दर १ लाख ११ हजार ६९० रुपये किलोलिटर इतके होते. सध्या ते १ लाख २१ हजार ८४७ रुपयांवर पोहोचले. १ जानेवारी २०२२ रोजी हे दर ७४ हजार ५१६ रुपये किलोलिटर इतके नोंदविण्यात आले होते. एखाद्या मार्गावर विमानफेरी चालवायची झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चात विमान इंधनाचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक असतो. इतर खर्चात कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल, विमानतळावरील शुल्क समाविष्ट असते. त्यामुळे विमान इंधन महागल्यावर फेरीमागील खर्चात आपोआप वाढ होते. हा अतिरिक्त भार तिकिटांच्या दरात वाढ करून प्रवाशांकडून वसूल केला जातो.
मुंबईतील विमान इंधनाचे दर महिना किंमत (रुपयांत)जानेवारी ७४,५१६फेब्रुवारी ८६,०३८मार्च ९१,९९८एप्रिल १,११,६९०मे १,२१,८४७