विमान प्रवास आणखी ५ टक्क्यांनी महागला; ‘विस्तारा’च्या वैमानिकांच्या सुट्ट्यांचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:01 AM2024-04-15T08:01:04+5:302024-04-15T08:01:25+5:30
विमान तिकिटातील वाढ ही मुंबई ते दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर या मार्गांवर नोंदली गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विस्तारा कंपनीच्या वैमानिकांच्या सुट्ट्यांचा परिणाम विस्तारा कंपनीच्या विमान फेऱ्या कमी होण्यात झाल्यानंतर आता ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात देशांतर्गत विमान प्रवासाच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी महागल्याचे दिसून आले आहे. विमान तिकिटातील वाढ ही मुंबई ते दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर या मार्गांवर नोंदली गेली आहे.
देशांतर्गत पर्यटनस्थळांच्या विमान प्रवास दरातही किमान १२ ते कमाल २५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात इंजिनातील बिघाड आणि कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याने गो-फर्स्ट कंपनीची ५६ विमाने जमिनीवर स्थिरावली. देशांतर्गत विमान सेवेतील ५६ विमाने एकाचवेळी कमी झाल्यामुळे अन्य विमान कंपन्यांवर वाढत्या प्रवासी संख्येचा ताण आला आहे.
...यामुळे वाढ
एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर विस्तारा कंपनीच्या वैमानिकांना एअर इंडिया कंपनीच्या वैमानिकांप्रमाणे वेतन देणार असल्याच्या मुद्द्यावरून विस्तारा कंपनीचे वैमानिक नाराज झाले आहेत. या वैमानिकांनी सातत्याने रजा घेत आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याचा थेट फटका कंपनीच्या सेवेला बसला असून कंपनीला आपल्या दैनंदिन फेऱ्यात कपात करावी लागली.