विमानप्रवास ‘टॉप’ला; डिसेंबरमध्ये ४८ लाख लोकांची मुंबईहून भरारी; नव्या विक्रमाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 07:33 AM2024-01-12T07:33:47+5:302024-01-12T07:34:23+5:30

मुंबई विमानतळावरून डिसेंबर महिन्यात प्रवासी संख्येचा उच्चांक

Air travel to the 'top'; Inflow of 48 lakh people in December; Flight peak from Mumbai | विमानप्रवास ‘टॉप’ला; डिसेंबरमध्ये ४८ लाख लोकांची मुंबईहून भरारी; नव्या विक्रमाची नोंद

विमानप्रवास ‘टॉप’ला; डिसेंबरमध्ये ४८ लाख लोकांची मुंबईहून भरारी; नव्या विक्रमाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नुकत्याच सरलेल्या डिसेंबर महिन्यात मुंबईविमानतळावरून तब्बल ४८ लाख ८० हजार लोकांनी प्रवास केला असून यानिमित्ताने एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या वर्षात मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात प्रवासी संख्येचा सर्वोच्चांक गाठला  गेला आहे.

१६ डिसेंबर २०२३ या एका दिवसात विमानतळावरून तब्बल १ लाख ६५ हजार २५८ लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने प्रवास करण्याचा हा एक उच्चांक मानला जात आहे. २०२२ या वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई विमानतळावरून एकूण ४३ लाख ७० हजार लोकांनी प्रवास केला होता. त्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कोरोना काळानंतर अर्थात २०१९ नंतर ही प्रवासी वाढ तब्बल ११२ टक्के इतकी आहे.

  कुठल्या प्रवासाला पसंती ?  
 मुंबई विमानतळावरून देशांतर्गत मार्गांवर दिल्ली, बंगळुरू, गोवा आदी ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. एकट्या दिल्ली शहरासाठी ६ लाख २२ हजार ४२४ लोकांनी मुंबईतून प्रवास केला. 
 आंतरराष्ट्रीय मार्गांमध्ये दुबई, लंडन आणि अबुधाबी येथे सर्वाधिक लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. यापैकी ४७ टक्के प्रवासी मध्यपूर्वेतील देशांत गेले. आशियाई देशांत जाणाऱ्या प्रवाशांची टक्केवारी २८ टक्के इतकी होती तर १५ टक्के प्रवासी युरोपला गेले. 
किती विमान वाहतूक झाली ?
डिसेंबर महिन्यात मुंबई विमानतळावर विमानांच्या एकूण २८ हजार ४६२ फेऱ्या झाल्या. यामध्ये ७२८७ फेऱ्या या आंतरराष्ट्रीय मार्गावर झाल्या. तर २१ हजार १७५ फेऱ्या या देशांतर्गत मार्गांवर झाल्या आहेत.

Web Title: Air travel to the 'top'; Inflow of 48 lakh people in December; Flight peak from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.