देशांतर्गत तिकिटांच्या दरात १३ ते १६ टक्क्यांपर्यंत हाेणार वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे प्रवासाआधी ४८ तास कोरोना चाचणी अहवाल मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या विमान प्रवाशांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आणखी एक धक्का दिला आहे. देशांतर्गत तिकिटांच्या दरात वाढ करण्यास परवानगी देण्यात आली असून, येत्या १ जूनपासून नवे दर लागू होतील.
प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय घट, इंधन दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे विमान कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत. कामगारांचे वेतन, विमानतळावरील भाडे आणि कर भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, तिकीट शुल्कावरील किमान मर्यादा वाढविल्याने दर १३ ते १६ टक्क्यांपर्यंत वधारणार आहेत. यामुळे विमान कंपन्यांना सावरण्यास मदत होणार असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
पहिल्या लॉकडाऊननंतर २५ मे रोजी देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करताना तिकीट दरावरील कमाल आणि किमान मर्यादा निश्चित करण्यात आली. वाहतूक परवानगीचा गैरफायदा घेऊन विमान कंपन्यांनी अवाजवी दरवाढ करू नये, हा त्यामागील हेतू होता. अलीकडेच किमान मर्यादेत ५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा त्यात वाढ केल्याने विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
* नवीन दरपत्रक असे (किमान भाडे)
४० मिनिटांपर्यंत - २६०० रुपये
४० ते ६० मिनिटे - ३३०० रुपये
६० ते ९० मिनिटे - ४००० रुपये
९० ते १२० मिनिटे - ४७०० रुपये
१२० ते १५० मिनिटे - ६१०० रुपये
१५० ते १८० मिनिटे - ७४०० रुपये
१८० ते २१० मिनिटे - ८७०० रुपये
* दैनंदिन देशांतर्गत प्रवासी संख्या (सरासरी)
फेब्रुवारी - २ लाख ७९ हजार
मार्च - २ लाख ६० हजार
एप्रिल - १ लाख ९० हजार
२५ मे - ३९ हजार
* ५० टक्के प्रवासी क्षमतेचे बंधन
१ जूनपासून तिकीट दर वाढणार असले तरी विमानात ५० टक्के प्रवासी क्षमतेचे बंधन पाळावे लागेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. याआधी ही मर्यादा ८० टक्के होती.
-----------------------------------