लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा फटका भारतातून युरोपात जाणाऱ्या प्रवाशांना बसत असून, प्रवासात तासाभराची वाढ झाली आहे. वाढत्या कालावधीमुळे प्रवास खर्चातही वाढ झाली आहे. भारतातून युरोपात वर्षाकाठी हजारो लोक प्रवास करतात. दुबई आणि थायलंडनंतर प्रामुख्याने भारतीय प्रवाशांचा प्रवासाचा कल हा युरोपियन देशात आहे. मात्र, तेथील प्रवास व प्रवास खर्च या दोन्हींमध्ये आता वाढ झाली आहे. एअर इंडिया कंपनीने इस्रायलसाठी आपली विमानसेवादेखील स्थगित केली आहे. इस्रायलसाठी आठवड्यातून चार वेळा कंपनीचे विमान भारतातून उड्डाण करत होते. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर एअर इंडिया कंपनीने इस्रायलसाठी सेवा स्थगित केली होती. ३ मार्च रोजी ही सेवा पूर्ववत केली. मात्र, आता इराणसोबत तणाव वाढल्यामुळे पुन्हा एकदा ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.
आतापर्यंत दोन मार्ग केले बंदभारतातून युरोपातील देशात जाण्यासाठी इराणवरून जाणारा आकाश मार्ग जवळचा आहे. मात्र, तिथे युद्धाचे ढग जमा झाल्यानंतर आता इराणच्या हद्दीतून उड्डाण करणे सर्व कंपन्यांनी थांबवले आहे. त्याऐवजी उत्तरेकडील पर्यायी मार्गावरून विमानांनी प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर त्या मार्गावरून भारतीय कंपन्यांनी प्रवास थांबवला होता.