लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परिवहन विभागाने (आरटीओ) वायूवेग पथकासाठी ७६ इंटरसेप्टर वाहनांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. इंटरसेप्टर वाहनांमध्ये रडार स्पीड गन, ब्रेथ अनलायझर, टिंट मीटर, फायर इक्सटीग्शर, फर्स्ट रिस्पॉन्ड किट या बाबींचा समावेश असतो.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, राज्यात मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत रस्त्यावर आरटीओ विभागाचे वायूवेग पथक तैनात आहे. कारवाईला गती देण्यासाठी नवीन ७६ इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्यात यावेत, अशी मागणी परिवहन विभागाने केली होती. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. लवकरच खरेदी प्रक्रिया होईल.
दरम्यान, वायूवेग पथकातील बहुसंख्य वाहने दहा वर्ष जुनी झाली असून, ४ ते ५ लाख किमी धावलेली आहेत. ही वाहने रस्त्यावर वापरणे धोकादायक आहे. तात्पुरती दुरुस्ती करून वाहनांचा वापर करण्यात येत आहे. जुन्या वाहनांमुळे अपघात होऊन अधिकाऱ्यांच्या जिवाला धोका पोहचू शकतो. त्यामुळे वायूवेग पथकासाठी इंटरसेप्टर वाहने खरेदी केल्यामुळे कारवाईला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
......................