शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पक्षात घेण्यापूर्वीच शाहीथाटात पाहुणचार केला. कांबळे यांचा राजीनामा विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे पुण्याला जाऊन सुपूर्द करण्यासाठी ठाकरे यांनी मुंबईतून खासगी चार्टर विमान पाठवले. त्यामुळे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनाही धक्का बसला आहे.
शनिवारी रात्री आमदार कांबळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेना नेते सचिन बडधे हे होते. तत्पूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे कांबळे यांच्या समवेत ठाकरे यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन हे स्वत: येथून उत्सुक होते. संपर्क प्रमुख आमदार दराडे हे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व येवला बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र आमदार कांबळे हे सर्वांवर भारी ठरले आहेत.
कांबळे यांना मुंबईतून रात्री सात वाजता पुण्याला बागडे यांच्याकडे रवाना करण्याचा निर्णय झाला. ठाकरे यांनी खासगी चार्टर विमान दिले. समवेत मिलिंद नार्वेकर यांनाही पाठविले. रावसाहेब खेवरे, सचिन बडधे हे आमदार कांबळे यांच्या समवेत पुण्याला आले. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पुणे विमानतळावरच कांबळे यांनी बागडेंकडे राजीनामा सुपूर्द करत काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ केला.