विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिली ३ कोटी ३४ लाखांची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 05:34 AM2019-01-07T05:34:50+5:302019-01-07T05:35:27+5:30
डीजीसीएचा अहवाल : उड्डाणाला विलंब, विमान रद्द होणे, प्रवेश नाकारल्याचा फटका
खलील गिरकर
मुंबई : उड्डाणाला विलंब, विमान रद्द झाल्याने आणि प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारल्याबद्दल नुकसानभरपाईपोटी विमान कंपन्यांना ३ कोटी ३४ लाख ७५ हजार रुपये द्यावे लागल्याची माहिती डीजीसीएच्या नोव्हेंबर महिन्याच्या अहवालातून समोर आली आहे.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अहवालानुसार, विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने २६ हजार १४८ प्रवाशांना नुकसानभरपाई देण्यासाठी व इतर सुविधांपोटी ५४ लाख ८७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच नोव्हेंबर महिन्यात विविध कारणांमुळे २ हजार ६१६ प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाईपोटी १ कोटी ५२ लाख २८ हजार रुपये देण्यात आले. विमानांच्या उड्डाणाला झालेल्या विलंबाचा फटका देशभरातील १ लाख १५ हजार ७४१ प्रवाशांना बसला. त्यांना पुरवलेल्या विविध सुविधांवरही १ कोटी २७ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. विमान उड्डाणासाठी विलंब झाल्यास किंवा उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याची व सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांवर असते.
‘जेट’ने नाकारला १ हजार २१८ प्रवाशांना प्रवेश
विमानात प्रवेश नाकारल्याच्या सर्वाधिक घटना जेट एअरवेजच्या विमानांमध्ये घडल्या. १ हजार २१८ प्रवाशांना बोर्डिंग नाकारण्यात आले. त्यांना पुरवलेला परतावा, पुन्हा तिकीट काढून देणे व इतर सुविधांवर ८७ लाख ५६ हजार रुपये खर्च करण्यात आले.
विमान रद्द होण्याचा सर्वात जास्त फटका इंडिगोच्या ११ हजार ९५५ प्रवाशांना बसला. विमानाच्या उड्डाणाला दोन तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याचा फटका बसण्यामध्येदेखील इंडिगोचा प्रथम क्रमांक आहे. इंडिगोच्या ५० हजार २४३ प्रवाशांना त्यामुळे मनस्ताप झाला.
त्याखालोखाल एअर इंडियाच्या ३२ हजार ९३७ प्रवाशांना विलंबाचा फटका बसला. त्यांना प्रशासनाने पुरवलेल्या नाश्ता, परतावा व इतर सुविधांवर ५० लाख ५६ हजार रुपये खर्च करण्यात आला.