सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या ९ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होणार असून, मुंबई ते चिपी मार्गावर पहिले विमान झेपावणार आहे. या प्रवासासाठी २ हजार ५२० रुपये भाडे आकारले जाणार आहे. हे विमान १ तास २५ मिनिटांत मुंबईहून सिंधुदुर्गला पोहोचेल.
एअर इंडियाची उपकंपनी असलेली ‘अलायन्स एअर’ ९ ऑक्टोबरपासून मुंबई-चिपी-मुंबई मार्गावर नियमित विमानफेरी सुरू करणार आहे. केंद्र सरकारच्या प्रादेशिक संपर्क योजनेंतर्गत (उडान) ही सेवा सुरू केली जात असून, एअर अलायन्स मुंबई-चिपी आणि चिपी-मुंबई हा अनुक्रमे ७४ आणि ७५ वा मार्ग खुला करणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई-चिपी-मुंबई प्रवासाकरिता ‘एटीआर-७२ ६००’ हे विमान तैनात केले जाणार आहे. त्याची आसन क्षमता ७० इतकी आहे. ‘९आय- ६६१’ क्रमांकाचे विमान दररोज सकाळी ११.३५ वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण घेईल आणि दुपारी १ वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल, तर ‘९आय- ६६२’ क्रमांकाचे विमान चिपीहून दुपारी १.२५ ला निघून २.५० ला मुंबईत दाखल होईल.
या प्रवासाकरिता शुभारंभीचे शुल्क मुंबई ते सिंधुदुर्ग २ हजार ५२० रुपये आणि सिंधुदुर्ग ते मुंबई फेरीसाठी २ हजार ६२१ रुपये इतके ठरविण्यात आले आहे. रस्तेमार्गे हा प्रवास करायचा झाल्यास ९ ते १० तासांचा कालावधी लागतो. नव्या विमान सेवेमुळे हे अंतर १ तास २५ मिनिटांत गाठता येईल, अशी माहिती ‘अलायन्स एअर’च्या प्रवक्त्यांनी दिली.
......
मुंबई विमानतळावर एक स्लॉट
- या नव्या मार्गासाठी मुंबई विमानतळाने एक स्लॉट उपलब्ध करून दिला आहे. सध्या टर्मिनल २ वरून मुंबई-सिंधुदुर्ग विमानाचे उड्डाण होईल. मात्र, टर्मिनल १ खुले केल्यानंतर तेथून नियमित विमान प्रचलन होणार आहे.
- त्याशिवाय हैदराबाद-सिंधुदुर्ग-हैदराबाद मार्गावरही विमानफेरी चालविण्याचे विचाराधीन असून, त्यासाठी चाचपणी सुरू आहे. या फेरीचे भाडे २ हजार ६०० रुपयांपर्यंत असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.