हॉस्पिटलच्या कामासाठी ऐरोलीत उद्यानाचा बळी
By admin | Published: January 14, 2015 02:39 AM2015-01-14T02:39:12+5:302015-01-14T02:39:12+5:30
बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी उद्यानाचा वापर करण्यात आला असून याविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नवी मुंबई : ऐरोलीमधील महापालिका हॉस्पिटलचे बांधकाम करण्यासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी उद्यानाचा वापर करण्यात आला असून याविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सिडकोने नवी मुंबईची रचना करताना प्रत्येक विभागात मैदान व उद्यानासाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. ऐरोली सेक्टर ३ मध्येही एल आकाराचे उद्यान तयार करण्यात आले होते. जानेवारी २००५ मध्ये महापालिकेने उद्यानाचे सुशोभीकरण करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान असे नाव दिले. २०१० मध्ये महापालिकेने येथील माताबाल रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले आहे. बांधकामासाठीचे साहित्य ठेवण्यासाठी या उद्यानाचा ८० टक्के भाग वापरण्यात आला. उद्यानाचे खंडर झाले असून साहित्य ठेवण्यात येणाऱ्या जागेवरील सर्व हिरवळ व झुडपे नष्ट झाली आहेत. प्रवेशद्वारापाशी काही भागात हिरवळ आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग मुलांसाठी होत नाही. येथे घसरगुंडी व पाळणेही लावण्यात आले आहेत. परंतु महापालिका व शेजारीच खाजगी रुग्णालयाचेही बांधकाम सुरू आहे. यामुळे या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी जाताच येत नाही.
महापालिका रुग्णालयाचे बांधकाम २०१२ मध्येच पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. दीड ते दोन महिन्यात मूळ ठेकेदाराचे काम संपणार आहे. परंतु पालिका प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे अतिदक्षता विभागात गॅस पाइपलाइन जोडण्याचा विसर पडला होता. सदर कामासाठी आता पुन्हा तोडफोड करावी लागणार आहे. परिणामी सदर काम अजून काही महिने चालणार आहे.
या ठिकाणी उद्यानाची दुरवस्था ठेकेदारामुळे झाली असून त्याच्याकडून दुरुस्तीचे काम करून घेणे आवश्यक आहे. ठेकेदारास बिल देण्यापूर्वी त्याच्याकडून खर्च वसूल करून घेतला पाहिजे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. रुग्णालयाचे बांधकाम उद्यानाच्या जागेत आहे का याचीही चौकशी करण्यात यावी. नागरिकांसाठी रुग्णालयाएवढीच उद्यानाचीही आवश्यकता आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान आवश्यक असून या जागेचा इतर कारणांसाठी वापर केला जाऊ नये अशी मागणी नागरिक करत आहेत. (प्रतिनिधी)