Join us

विमान प्राधिकरण वाचवतेय इंधन; पर्यावरणपूरक विमानतळासाठी योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:02 AM

विमानांच्या वाहतुकीत सातत्याने वाढ होत असल्याने विमानांची दाटीवाटी होऊ नये व हवाई वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना राबवली आहे.

मुंबई : धावपट्टीवर विमान अधिक काळ थांबल्याने इंधनाचा होणारा अपव्यय टाळण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले आहे़ याआधी विमानाचा धावपट्टीवरील थांबण्याचा कालावधी ६५ सेकंद होता, तो ४७ ते ४९ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे़ त्यामुळे इंधनाची बचत होत असून पर्यावरणासाठीही ते पोषक आहे.

विमान धावपट्टीवर थांबण्याच्या प्रक्रियेला रनवे ऑक्युपन्सी टाइम (आरओटी) असे म्हणतात़ २०१४ पासून विमान वाहतुकीमध्ये वाढ झाली़ मात्र आरओटी वाढू नये, यासाठी विमानतळ प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या. आंतरराष्ट्रीय विमानतळावर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विमानतळावरील वीज वापर कमी व्हावा व सौरऊर्जा वापराला अधिक चालना मिळावी यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ३२०५ केडब्ल्यूपी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. याशिवाय १३८१ केडब्ल्यूपी क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जीएचजी उत्सर्जनामध्ये १६ टक्के घट करण्यात यश आले आहे. विमानाचे उड्डाण होताना व लँडिंग होताना विमानतळ परिसरातील नागरिकांना होणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

येथून दरवर्षी ४ कोटी ८८ लाख ३० हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. विमानांच्या वाहतुकीत सातत्याने वाढ होत असल्याने विमानांची दाटीवाटी होऊ नये व हवाई वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना राबवली आहे. विमानाला एअरो ब्रिज लावणे, वैमानिकासोबत एएमईचा संपर्क प्रस्थापित करणे, प्रवाशांची बोर्डिंग प्रक्रिया, विमानात इतर वस्तू चढविणे व उतरविणे, विमानामध्ये इंधन भरणे व विमानाची स्वच्छता करणे अशा विविध बाबींसाठी लागणाºया वेळेची नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करून कमीतकमी वेळेत या सर्व प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. परिणामी, एअरपोर्टवरील ऑन टाइम परफॉर्मन्स (ओटीपी)मध्ये १२ टक्क्यांची वाढ करण्यात यश मिळाले आहे.

केवळ एका धावपट्टीचा वापर करून २४ तासांमध्ये ९६९ विमानांची वाहतूक केले जाणारे ‘जगातील व्यस्त विमानतळ’ अशी मुंबई विमानतळाची ओळख आहे. देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येमध्ये २०१४-१६ च्या तुलनेत २०१६-१८ या कालावधीत २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. या विमानतळावरून होणाºया विमानांच्या वाहतुकीत १० टक्के वाढ झाली आहे. हवाई मालवाहतुकीमध्ये २१ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत विमानतळातर्फे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमासाठी ३ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले.

विमानतळावर तयार होणाºया कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत असून २०१६-१८ दरम्यान ९९५१.७५ मेट्रिक टन कचरा तयार झाला होता, त्यापैकी १५८.५९ मे. टन कचरा धोकादायक होता. ९७९३.१६ मे. टन कचºयापैकी ३३४३.१६ मे. टन कचºयावर प्रक्रिया करण्यात आली. ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर प्रकल्प राबविण्यात येत असून त्याद्वारे दररोज १ मे. टन कचºयावर प्रक्रिया केली जाते. याद्वारे तयार होणारे खत विमानतळ परिसरातील फुलझाडे व इतर झाडांसाठी वापरले जाते तसेच अतिरिक्त खत स्वयंसेवी संस्थांना दिले जाते.