विमान कंपनीतील महिलेचे खाते रिकामे; फ्लाइटवर जाताच रक्कम गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:45 PM2023-07-17T12:45:17+5:302023-07-17T12:45:39+5:30
तक्रारदार विमान कंपनीत नोकरीला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पतीही कामानिमित्त बाहेरगावी असतात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विमान कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या खात्यावर सायबर भामट्याने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. यात महिलेच्या खात्यातून १ लाख ८४ हजार रुपये गायब झाले आहेत. याप्रकरणी नवघर पोलिसांनी सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार विमान कंपनीत नोकरीला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पतीही कामानिमित्त बाहेरगावी असतात. २ फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कची फ्लाईट असल्याने रात्री १० वाजता त्या फ्लाईटवर गेल्या. तेथील हॉटेलच्या वायफायवर मोबाईल कनेक्ट करून पतीशी संपर्क साधताच, खात्यावरून पैसे जात असल्याचे समजले. त्यांनी अकाउंट तपासताच खात्यातून १ लाख ८४ हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकाराने त्यांना धक्का बसला.
पतीने तत्काळ १९३० या सायबर पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल करून झालेल्या प्रकाराबाबत सांगितले. कोणीतरी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत खात्यातील गोपनीय माहिती चोरून पैशांवर हात साफ केल्याचा संशय त्यांनी वर्तवला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वायफाय सुविधेचा गैरफायदा घेत काही हॅकर मोबाईल हॅक करतात. त्यातील हा प्रकार आहे का, यानुसारही पोलिस अधिक तपास करत आहे.