मुंबई - घाटकोपर येथील चार्टर्ड विमान दुर्घटनेमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानाच्या वैमानिक मारिया कुबेर यांना हवामान खराब असतानाही विमानाटी चाचणी घेण्यास सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत मारिया कुबेर यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला आहे. घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ झालेल्या या अपघातात एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. विमानाच्या पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांच्यासोबत पादचारी गोविंद पंडित यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, पायलट मारिया यांचे पती प्रभात कथुरिया यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोतलाना खराब हवामान असतानाही कंपनीने विमानाची चाचणी घेण्यास भाग पाडले, असा आरोप केला. घाटकोपर येथील अपघातग्रस्त चार्टर विमानाची पायलट मारिया प्रभात जुबेरी (47) हि मीररोडच्या काशीमीरा परिसरातील जयनगर रो हाऊस येथे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पती व मुलीसोबत राहते. ती कामाच्या सोयीनुसार मुंबईच्या जुहू तर रोडवरील रशीद मंझील इमारतीत फ्लॅट नं. 19 मध्ये सुद्धा वास्तव्य करीत असे. 2005 ते 06 दरम्यान ती एअर वर्क्स इंजिनीरिंग मध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून कार्यरत होती. जुलै 2006 ते एप्रिल 2010 मध्ये तीने ताज एअर लिमिटेड मध्ये एक्झीक्यूटिव्ह पायलट म्हणून काम केले. तीने आत्तापर्यंत एअर क्राफ्ट फाल्कन 2000, किंग एअर सी 90, टिबी 20 हि विमाने चालविली होती. तिची मुलगी परिसरातील महाविद्यालयात 11 वी मध्ये शिकत असून मुलीच्या शिक्षणासाठी तीने 2 वर्षे ब्रेक घेतला होता. तीने गुरुवारी सकाळी 8 वाजता घर सोडले होते. अपघातग्रस्त विमान पान पराग या कंपनीचे मालक कोठारी यांचे होते.